फरिदाबाद : जम्मू-काश्मीर आणि फरिदाबाद पोलिसांनी संयुक्त कारवाई करत डॉ. मुझम्मिल शकील याच्या घरातून मोठा शस्त्रसाठा जप्त केला.  
राष्ट्रीय

Jaish-e-Mohammed module | ‘जैश-ए-मोहम्मद’च्या मॉड्यूलचा पर्दाफाश

फरिदाबादमध्ये डॉक्टर, मौलवीसह 9 जणांंना अटक; 360 किलो स्फोटके आणि रायफलसह मोठा शस्त्रसाठा जप्त

पुढारी वृत्तसेवा

अनिल एस. साक्षी

जम्मू : बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’ आणि ‘अन्सार गजवत-उल-हिंद’शी संबंधित एका आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करत मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला. जम्मू-काश्मीर आणि फरिदाबाद पोलिसांनी संयुक्त कारवाई करत हे मोठे यश मिळवले.

जम्मू आणि काश्मीर, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये राबविलेल्या संयुक्त शोधमोहिमेदरम्यान प्रमुख दहशतवाद्यांसह 9 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि स्फोटकांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. यामध्ये 360 किलो स्फोटकांचा समावेश आहे. 27 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून अटक केलेल्या डॉ. आदिल अहमद राथेर याच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अटक केलेल्यांमध्ये एक मौलवी आणि एका महिलेसह 8 जणांचा समावेश आहे.

आरिफ निसार दार ऊर्फ साहिल, यासिर-उल-अश्रफ, मकसूद अहमद दार ऊर्फ शाहिद (तिघेही रा. नौगाम), मौलवी इरफान अहमद (मशिदीचा इमाम), अहमदअली मुहानला (दोघे रा. शोपियां), डॉ. मुझम्मिल अहमद गनई ऊर्फ मुसैब (रा. कोईल- पुलवामा) आणि डॉ. आदिल- वानपोरा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. डॉ. मुझम्मिल हा काश्मीरचा रहिवासी आहे आणि फरिदाबादच्या धौज भागातील अल-फलाह विद्यापीठात प्राध्यापक आहे. दरम्यान, या सर्वांना मदत करणार्‍या लखनौमधील एका डॉ. महिलेलाही अटक करण्यात आली आहे. डॉ. शाहीन असे तिचे नाव आहे.

पीटीआय’च्या वृत्तानुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये हल्ल्याचा कट आखण्यात आला होता. तो या कारवाईमुळे उधळण्यात सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. याआधी 9 नोव्हेंबरला जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी सादिक जमाल (वय 35) याला राज्य विशेष कार्य दलाने (एसटीएफ) अटक केल्याचे ‘पीटीआय’ने म्हटले आहे.

पोलिसांनी म्हटले आहे की, 19 ऑक्टोबर 2025 रोजी श्रीनगरमधील बनपोरा नौगाममध्ये विविध ठिकाणी जैश-ए-मोहम्मदची अनेक पोस्टर्स चिकटवण्यात आली होती. त्यात पोलिस आणि सुरक्षा दलांना धमकावण्यात आले होते. त्यानुसार विविध कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला होता. तपासादरम्यान कट्टरपंथी व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांचा समावेश असलेले एक व्हाईट कॉलर्रड दहशतवादी नेटवर्क उघड झाले. पोस्टर लावल्याच्या आरोपाखाली जम्मू-काश्मीर पोलिसांनी 27 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून डॉ. आदिल अहमद राथेरला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता दहशतवाद्यांचे मॉड्यूल उघड झाले. याच माहितीच्या आधारे या 8 जणांना अटक करण्यात आली.

महिला डॉक्टरला लखनौमधून अटक

दहशतवादी मॉड्यूलला मदत करणार्‍या डॉक्टर महिलेला लखनौमधून अटक करण्यात आली आहे. डॉ. शाहीन असे तिचे नाव आहे. तिच्या कारमधून एक एके-47 रायफल जप्त करण्यात आली आहे. तिला चौकशीसाठी श्रीनगरला आणण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT