नवी दिल्ली/जयपूर; वृत्तसंस्था : शारीरिक मर्यादा आणि गंभीर वैद्यकीय आव्हानांवर मात करत जयपूरच्या नीलिमा अरोरा यांनी जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. २५ मे २०२६ रोजी ८८४९ मीटर उंचीवर पोहोचलेल्या नीलिमा या थॅलेसेमिया मायनर असलेल्या जगातील पहिल्या महिला ठरल्याचा दावा करण्यात आला आहे.
नीलिमा यांनी आयआयटी मुंबईमधून २००१ मध्ये बीटेकचे शिक्षण घेतले असून त्या काही काळ कॅलिफोर्नियात सिलिकॉन व्हॅलिडेशन इंजिनिअर म्हणून कार्यरत होत्या. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी शारीरिक आव्हान स्वीकारण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला केवळ ट्रेकिंगपासून सुरू झालेला हा प्रवास पुढे अल्पाईन क्लायबिंगपर्यंत पोहोचला. त्यांनी माँ ब्लाँ, मॅटरहॉर्न, कोटोपॅक्सी, चिम्बोराझो, अकोंकाग्वा आणि अमादाब्लम यांसारखी शिखरे सर केली. २०२५ मध्ये त्या अमादाब्लम सर करणाऱ्या ४० वर्षांवरील पहिल्या भारतीय महिला ठरल्या.
थॅलेसेमिया मायनरमुळे शरीराची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता प्रभावित होते. एव्हरेस्टवरील कमी ऑक्सिजनमुळे त्यांचे आव्हान अधिक कठीण झाले. मोहिमेपूर्वी त्यांनी ऑक्सिजन कमी असलेल्या वातावरणातील सिम्युलेशन टेंटमध्ये प्रशिक्षण घेतले आणि कठोर सहनशक्तीचा सराव केला. जवळपास ५० दिवसांच्या मोहिमेदरम्यान त्यांना हाय-अल्टिट्यूड पल्मोनरी एडिमाचा त्रास तब्बल तीन वेळा झाला. डॉक्टरांनी मोहीम सोडून खाली उतरण्याचा सल्ला दिला. मात्र प्रत्येक वेळी प्रकृती सुधारल्यानंतर त्यांनी पुन्हा प्रयत्न केला.
२५ मे रोजी अखेर त्यांनी एव्हरेस्टचे शिखर गाठले. सुमारे ३० मिनिटे शिखरावर थांबून त्यांनी हा ऐतिहासिक क्षण अनुभवला. त्यांच्या या कामगिरीने विविध अडचणींशी झुंजणाऱ्या अनेकांना प्रेरणा मिळाली आहे.