अमरावती (आंध्र प्रदेश), वृत्तसंस्था : जगनमोहन रेड्डी यांच्या काळात आंध्रात करण्यात आलेल्या उधळपट्टीचा प्रकार समोर आला आहे. विशाखापट्टणम येथे समुद्राजवळ सुमारे 9.88 एकर परिसरातील उभारण्यात आलेल्या इमारत संकुलात तीन राजेशाही निवासस्थाने आणि चार कार्यालयीन इमारती बांधण्यात आल्या. या निवासस्थानांचा राजेशाही थाट एवढा की, महागड्या अंतर्गत सजावटीशिवाय चक्क बाथरूमही एका फ्लॅटच्या आकाराएवढे आहेत.
विशाखापट्टणमच्या ऋषीकोंडा हिल्स या समुद्रकिनार्यावर असलेल्या टेकड्यांवर हे सरकारी संकुल उभारण्यात आले असून, त्यासाठी पर्यावरण व सागरी नियम सर्रास पायदळी तुडवत सरकारी पैशाचा चुराडा करण्यात आल्याचा आरोप चंद्राबाबू नायडू सरकारने केला आहे. तेलुगू देसमचे आमदार गंता श्रीनिवास राव यांनी एनडीएच्या शिष्टमंडळासह या संकुलाला भेट दिली असता सारेच अवाक् झाले.
असा आहे पॅलेस आणि परिसर
टेकडीवरून समुद्राचे दर्शन घडवणारा हा ऋषी पॅलेसचा परिसर 9.88 एकरचा आहे. जगनमोहन रेड्डी यांच्या काळात तेथे सात लक्झरी इमारती बांधल्या गेल्या. त्यात तीन निवासी इमारती, चार कार्यालयीन इमारती आहेत. निवासी इमारतींमध्ये 12 बेडरूम आहेत. याशिवाय तारांकित हॉटेलसारख्या सोयी सुविधा, महागडे फर्निचर, सजावटीचे सामान, झळाळणारी झुंबरे, बाथटब, इटालियन मार्बलचा वापर आदी आहेत.