J. P. Will Nadda get the post of Rajya Sabha party leader
जेपी नड्डा यांना राज्यसभेत मिळणार महत्वाची जबाबदारी File Photo
राष्ट्रीय

जे. पी. नड्डा यांना मिळणार राज्यसभेत महत्वाची जबाबदारी ?

करण शिंदे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राज्यसभेत भाजपच्या जेष्ठ सदस्यांपैकी एक असलेले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्या गळ्यात राज्यसभेच्या पक्षनेते पदाचीही माळ पडण्याची शक्यता आहे. नड्डा यांच्याकडे असलेला भाजपच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ या महिन्यात संपणार आहे. मात्र, या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांच्याकडेच अध्यक्षपदाची धुरा कायम ठेवली जाण्याचे संकेत आहेत. नड्डा यांच्या सोबतीला एक अथवा दोन कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

जे. पी. नड्डा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. राज्यसभेतील भाजपच्या जेष्ठ सदस्यांपैकी ते एक आहेत. यापूर्वी पीयुष गोयल राज्यसभेचे नेते होते. मात्र, पीयुष गोयल लोकसभेवर निवडून आल्याने भाजपला राज्यसभेत नवीन नेत्याची निवड करावी लागणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ सदस्य म्हणून जे. पी. नड्डा यांची या पदावर वर्णी लागू शकते.

एप्रिल महिन्यात जे. पी. नड्डा गुजरातमधून राज्यसभेवर निवडून आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात नड्डा यांना सार्वजनिक आरोग्य, रसायन आणि खते मंत्रालयाचा कार्यभार देण्यात आला आहे. पहिल्या मंत्रिमंडळातही ते आरोग्य मंत्री होते. मंत्रिमंडळात समावेश झाल्याने नड्डा यांच्या जागेवर नवे राष्ट्रीय अध्यक्ष येतील, अशी चर्चा होती. मात्र, आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता, नड्डा यांच्याकडेच डिसेंबर, जानेवारीपर्यंत अध्यक्षपद कायम राहण्याची शक्यता आहे.

जे. पी. नड्डा राजकीय वजन आणखी वाढणार

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले जे.पी. नड्डा यांच्याकडे मंत्रीपदासह राज्यसभा नेतेपदाची जबाबदारी येणार असल्यामुळे त्यांचे महत्व खूप वाढणार आहे. पुढच्या काही महिन्यांत चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका असल्याने भाजप त्यांच्याकडे अध्यक्षपद कायम ठेवणार आहे. केंद्रीय आरोग्य आणि रसायन व खाते मंत्रालयाचा कार्यभार त्यांना सांभाळावा लागणार आहे. या सर्व पदांमुळे जे. पी. नड्डा यांचे राजकीय वजन आणखी वाढणार आहे.

SCROLL FOR NEXT