भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या वतीने (इस्रो) रविवारी (दि. 2) भारताचे प्रसिद्ध प्रक्षेपण वाहन एलव्हीएम 3 रॉकेट आपले पाचवे उड्डाण करणार आहे. एलव्हीएम 3 एम 5 या नावाने ओळखल्या जाणार्या या उड्डाणात भारताचा सर्वात वजनदार संचार उपग्रह सीएमएस-03 अंतराळात पाठवला जाईल. हा उपग्रह भारतीय नौदलासाठी अत्यंत खास आहे. तो केवळ सागरी क्षेत्रातील दळणवळण मजबूत करणार नाही, तर ऑपरेशन सिंदूरसारख्या महत्त्वपूर्ण मोहिमांमधून मिळालेल्या धड्यांना अधिक बळकट करेल.
भारताचे विश्वसनीय रॉकेट
एलव्हीएम 3 हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे सर्वात शक्तिशाली प्रक्षेपण वाहन आहे. याचे पूर्ण नाव लाँच व्हेईकल मार्क-3 आहे. हे रॉकेट अवजड उपग्रहांना अंतराळात नेण्यासाठी बनवण्यात आले आहे.
भारताचा सर्वात वजनदार संचार उपग्रह
सीएमएस 03 चे पूर्ण नाव कम्युनिकेशन सॅटेलाईट मिशन आहे. हा एक मल्टी-बँड संचार उपग्रह आहे, म्हणजेच तो अनेक प्रकारच्या रेडिओ लहरींवर काम करेल. याचे वजन सुमारे 4,400 किलो आहे. भारतातून जिओसिंक्रोनस ट्रान्स्फर ऑर्बिटमध्ये पाठवला जाणारा हा सर्वात वजनदार संचार उपग्रह असेल. ही एक अशी कक्षा आहे, जिथून उपग्रह सहजपणे जिओस्टेशनरी ऑर्बिटमध्ये पोहोचतो आणि पृथ्वीभोवती फिरत सतत संपर्क ठेवतो.
प्रक्षेपण सायंकाळी
26 ऑक्टोबर 2025 रोजी उपग्रहासह रॉकेटला जोडून प्रक्षेपण तळावर नेण्यात आले. आता अंतिम तपासणी सुरू आहे. प्रक्षेपण सायंकाळी 5.26 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून होईल.
7 वर्षे कार्यरत
हा उपग्रह सात वर्षे कार्यरत राहील. तो भारतीय भूभाग आणि विस्तीर्ण सागरी क्षेत्र कव्हर करेल. यामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि सुरक्षित डेटा ट्रान्समिशन यासारख्या सुविधा असतील. विशेष म्हणजे, हा उपग्रह दुर्गम भाग, जहाजे आणि विमानांना मजबूत कनेक्टिव्हिटी देईल.
प्रामुख्याने नौदलासाठी
हा उपग्रह प्रामुख्याने भारतीय नौदलासाठी तयार करण्यात आला आहे. नौदलाची जहाजे, पाणबुड्या आणि विमाने समुद्रात दूरवर जातात, जिथे सिग्नल कमकुवत होतात. हा उपग्रह नौदलाला सुरक्षित आणि वेगवान दळणवळण प्रदान करेल.