ISRO NVS-03 satellite launch
श्रीहरिकोटा: भारताने पुन्हा एकदा जगासमोर आपली वैज्ञानिक क्षमता सिद्ध केली आहे. आता भारताला नेव्हिगेशन प्रणालीसाठी इतर देशांवर अवलंबून राहण्याची गरज उरलेली नाही.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) भारताची स्वदेशी नेव्हिगेशन प्रणाली 'NavIC' (Navigation with Indian Constellation) अधिक सक्षम करण्यासाठी, पुढच्या पिढीतील 'NVS-03' हा नेव्हिगेशन उपग्रह यशस्वीपणे 'जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट' मध्ये स्थापित केला आहे. यामुळे 'NavIC' प्रणाली अधिक शक्तिशाली आणि अचूक बनली आहे.
आता भारतातील नागरिक स्वतःच्या नेव्हिगेशन प्रणालीचा वापर करू शकतील. ही कामगिरी भारताची ताकद दर्शवते एक असा देश जो प्रगत तंत्रज्ञानासाठी केवळ इतर देशांवर अवलंबून न राहता, स्वतःच्या क्षमतेच्या जोरावर पुढे जात आहे. भारताच्या या स्वदेशी नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचा वापर केवळ लष्करी किंवा विशिष्ट तांत्रिक गरजांपुरता मर्यादित राहणार नाही, तर तो सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनातही अत्यंत उपयुक्त ठरेल.
परकीय GPS प्रणालींवरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला हा उपक्रम भारताच्या धोरणात्मक स्वायत्ततेलाही मोठी चालना देईल. शुक्रवारी रात्री ११:५१ वाजता, श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या प्रक्षेपण मंचावरून ५० मीटर उंच, तीन टप्प्यांचे GSLV-F18 रॉकेट अवकाशात झेपावले. या रॉकेटद्वारे २,२३२ किलो वजनाचा NVS-03 उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. उपग्रहाला त्याच्या नियोजित 'जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट' (GTO) मध्ये यशस्वीपणे स्थापित करून ही मोहीम पूर्ण करण्यात आली. स्मार्टफोनवरही स्वदेशी तंत्रज्ञानाची ताकद दिसून येणार आहे.
NVS-03 चे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची सुधारित सिग्नल क्षमता. हा उपग्रह L1, L5 आणि S बँडमध्ये सिग्नल प्रसारित करेल. NavIC प्रणाली पूर्वी प्रामुख्याने L5 आणि S बँडवर कार्यरत होती, परंतु आता NVS-03 मध्ये L1 बँडचाही समावेश करण्यात आला आहे. L1 फ्रिक्वेन्सीचा वापर जागतिक स्तरावर स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि इतर अनेक आधुनिक वेअरेबल उपकरणांमध्ये केला जातो. यामुळे सामान्य जनतेला या स्वदेशी नेव्हिगेशन प्रणालीचा वापर करणे अधिक सुलभ होईल.
NVS-03 मध्ये इस्रोच्या 'स्पेस ॲप्लिकेशन्स सेंटर' (Space Applications Centre) द्वारे विकसित केलेले स्वदेशी रुबिडियम ॲटॉमिक क्लॉक (अणू घड्याळ) बसवण्यात आले आहे. सॅटेलाईट नेव्हिगेशनसाठी अत्यंत अचूक वेळ मोजणे अत्यंत महत्त्वाचे असते, कारण एखाद्या विशिष्ट ठिकाणाचे अचूक स्थान निश्चित करण्यासाठी उपग्रहांकडून प्राप्त होणाऱ्या सिग्नलमधील वेळेच्या फरकाची गणना करावी लागते. भारताच्या सीमांच्या पलीकडे १,५०० किलोमीटरपर्यंत सेवा विस्तार NavIC प्रणाली अमेरिकेच्या GPS प्रणालीप्रमाणेच 'पोझिशनिंग, नेव्हिगेशन आणि टाइमिंग' (PNT) सेवा पुरवण्यासाठी विकसित करण्यात आली आहे.
या प्रणालीची व्याप्ती संपूर्ण भारतभर असून ती भारताच्या सीमांच्या पलीकडे सुमारे १,५०० किलोमीटरपर्यंत विस्तारलेली आहे. रस्ते वाहतूक, सागरी नेव्हिगेशन, विमान वाहतूक, आपत्ती व्यवस्थापन आणि धोरणात्मक मोहिमा यांसारख्या क्षेत्रांत ही प्रणाली महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.