israel bumper job offer for india 50000 indians to get jobs in 5 years decision made in pm modi and netanyahus meeting
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन इस्त्रायल २०३० पर्यंत आणखी ५०,००० भारतीय कामगारांना काम करण्याची परवानगी देण्यास तयार आहे. सेवा, बांधकाम आणि देखभाल (केअर) क्षेत्रात सुरक्षित स्थलांतर सुनिश्चित करण्यासाठी भारत आणि इस्त्रायल यांच्यात करार करण्यात आले आहेत.
पुढील पाच वर्षांत इस्त्रायल ५०,००० भारतीयांना आपल्या देशात काम करण्याची संधी देणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या बैठकीत गुरुवारी हा निर्णय घेण्यात आला. याचा अर्थ असा की इस्त्रायल दरवर्षी सरासरी सुमारे १०,००० भारतीयांना नोकरी देईल.
दरम्यान, एका इस्त्रायली रेडिट युजरने लिहिले आहे, “मला भारत आणि भारतीय खूप प्रिय आहेत. दक्षिण आशियामध्ये यहुद्यांचे हजारो वर्षांपासून खुले दिलाने स्वागत झाले आहे (आजच्या कोचीजवळील मालाबार किनाऱ्यावर यहुद्यांच्या पहिल्या आगमनापासून) आणि तेव्हापासून आम्ही हिंदू व मुसलमानांसोबत सौहार्दाने राहत आलो आहोत. मी अनेक वर्षे भारतात राहिलो आणि मला कधीही यहुदीविरोधी भावना जाणवली नाही.”
मोदी–नेतन्याहूंकडून भारतीय कामगारांसाठी हिरवा कंदील
द इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, दोन्ही पंतप्रधानांनी इज्रायलमधील भारतीय कामगारांचे योगदान मान्य केले. त्यांच्या कामामुळे दोन्ही देशांमधील मैत्रीचे नाते अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले. बांधकाम आणि केअर क्षेत्रात भारतीय कामगारांची सुरक्षित ये-जा सुलभ करण्यासाठी नोव्हेंबर २०२३ मध्ये स्वाक्षरी झालेल्या फ्रेमवर्क करार आणि अंमलबजावणी प्रोटोकॉलचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.
इज्रायलमध्ये सध्या २० हजार भारतीय कामगार
बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनानुसार, वाणिज्य व सेवा, उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) आणि रेस्टॉरंट क्षेत्रांशी संबंधित प्रोटोकॉलवर स्वाक्षरी झाल्याचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले.
ऑगस्ट २०२५ पर्यंत इस्त्रायलमध्ये २०,००० हून अधिक भारतीय नागरिक काम करत आहेत. यापैकी बहुसंख्य कामगार बांधकाम आणि केअर क्षेत्रात काम करून कामगारांची कमतरता भरून काढत आहेत.
डेटा सायन्स, एआयमध्येही मोठ्या संधी
मोदी यांनी प्रस्थानापूर्वी भारतीय प्रवासी समुदायाच्या सदस्यांची भेट घेतली. दोन्ही पंतप्रधानांनी कामगारांची सुरक्षा आणि कायदेशीर हक्क सुनिश्चित करण्यावर भर दिला.
डेटा सायन्स, एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि हाय-टेकसारख्या उच्च कौशल्यांच्या क्षेत्रात भारतीय व्यावसायिकांसाठी संधी वाढवण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.
इस्त्रायली वृद्धांच्या देखभालीत भारतीय
तेल अवीव येथील भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, इस्त्रायलमधील बहुतांश भारतीय केअरगिव्हर म्हणून इस्त्रायली वृद्धांची देखभाल करतात. याशिवाय हिरे व्यापारी, आयटी व्यावसायिक आणि विद्यार्थीही मोठ्या संख्येने आहेत.
कामगारांच्या प्रश्नांवर लवकरच अधिक चर्चा
दोन्ही नेत्यांनी संयुक्त समन्वय समितीच्या (JCC) कामकाजाचा आढावा घेतला आणि कामगारांशी संबंधित प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा करून ते शक्य तितक्या लवकर सोडवण्यासाठी नियमित बैठकांचे निर्देश दिले.
इस्त्रायलमध्ये ८५,००० भारतीय मूळचे यहुदी
तेल अवीवमधील भारतीय दूतावासाच्या माहितीनुसार, इस्त्रायलमध्ये सुमारे ८५,००० भारतीय मूळचे यहुदी राहतात. भारतातून इस्त्रायलमध्ये स्थलांतर १९५० आणि १९६० च्या दशकात वेगाने सुरू झाले. यामध्ये बहुसंख्य महाराष्ट्रातील (बेने इस्रायली) आहेत; तर कमी प्रमाणात केरळ (कोचिनी यहुदी) आणि कोलकाता (बगदादी यहुदी) येथील लोक आहेत.
अलीकडच्या काळात मिझोराम आणि मणिपूर (बेने मेनाशे) येथूनही काही भारतीय यहुदी इज्रायलमध्ये स्थलांतर करत आहेत. जुनी पिढी भारताशी घट्ट जोडलेली असली तरी, तरुण पिढी इस्त्रायली समाजात अधिकाधिक मिसळत चालली आहे.