पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली पोलिसांनी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (इसिस) चा दहशतवादी रिझवान अली याला अटक केली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एएनआय) त्याच्यावर ३ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. तो दिल्लीतील दर्यागंजचा रहिवासी आहे.
रिझवान हा पुणे इसिसचा मोस्ट वाँटेड दहशतवादी आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे. तपास यंत्रणा एनआयएने रिझवानला वाँटेड घोषित केले होते.
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) जुलै २०२३ मध्ये पुण्यात शस्त्र, स्फोटके, रसायने आणि इसिस संदर्भातील साहित्य जप्त केल्या प्रकरणी ११ जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. मार्च २०२४ मध्ये एनआयएने या प्रकरणी दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात रिझवान अलीसह अन्य तीन आरोपींची नावे होती. सर्व आरोपी प्रतिबंधित दहशतवादी संघटना 'इसिस'चे सदस्य आहेत. घटनेच्या दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या कटाचा एक भाग म्हणून पुणे आणि आसपास दहशतवाद पसरवण्याच्या योजनांमध्ये त्यांचा सहभाग होता, असेही एनआयएने आपल्या आरोपपत्रात म्हटलं आहे. आरोपी गुप्त कम्युनिकेशन ॲप्सद्वारे परदेशातील दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचेही तपासात आढळून आले आहे. तसेच दहशतवादी कारवाया करण्यासाठी त्यांच्या हस्तकांकडून पैसे घेत होते.
रिझवान याने पुण्यातील कोंढवा येथे आयईडी फॅब्रिकेशनचे प्रशिक्षण घेतले होते. त्याने नियंत्रित स्फोट घडवून आणल्याचे एनआयएच्या तपासात उघड झाले आहे. एनआयएच्या निष्कर्षांनुसार, दहशतवादी हल्ल्यांसाठी स्वत:ला तयार करताना आरोपींनी पिस्तुल चालविण्याचेही प्रशिक्षणही घेतले होते.