पुढारी ऑनलाईन : पंजाबमधील भाजप नेते मनोरंजन कालिया यांच्या जालंधर येथील निवासस्थानी आज (दि. ८) पहाटे स्फोट झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. गुन्ह्यात वापरलेला ई-रिक्षा देखील जप्त करण्यात आली असून, जातीय सलोखा बिघडवण्यासाठी हा गुन्हा करण्यात आला होता. हा पाकिस्तानच्या 'आयएसआय'चा एक मोठा कट होता. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि (पाकिस्तानी गुंड) शहजाद भट्टी याचा सहकारी असलेल्या झीशान अख्तर याने हा कट रचला होता, अशी माहिती विशेष पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) अर्पित शुक्ला यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
अर्पित शुक्ला म्हणाले की, जालंधरमध्ये मनोरंजन कालिया यांच्या निवासस्थानी स्फोट घडवून आणण्यामागे पाकिस्तानच्या आयएसआयचा एक मोठा कट होता. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि (पाकिस्तानी गुंड) शहजाद भट्टी यांचा सहकारी असलेल्या झीशान अख्तर यांनी कट रचला होता. या प्रकरणी बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या संभाव्य संबंधांची चौकशी सुरू आहे, पंजाब पोलिस केंद्रीय यंत्रणांच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मंगळवार पहाटे जालंधर येथील कालिया यांच्या निवासस्थानी झालेल्या स्फोटात घराच्या खिडक्या, सयूव्ही आणि अंगणातील मोटारसायकल फुटली होती. सुदैवाने या स्फोटात कोणीही जखमी झाले नाही. माजी कॅबिनेट मंत्री आणि पंजाब भाजपचे माजी अध्यक्ष कालिया हे स्फोट झाला तेव्हा घरीच होते, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. दरम्यान. गेल्या चार ते पाच महिन्यांत अमृतसर आणि गुरुदासपूरमध्ये पोलिस चौक्यांना लक्ष्य करून स्फोटांच्या अनेक घटना घडल्या आहेत परंतु एखाद्या प्रमुख राजकारण्याच्या घराला लक्ष्य करण्याची ही पहिलीच घटना आहे. गेल्या महिन्यात अमृतसरमधील एका मंदिराबाहेर स्फोट झाला होता.