राष्ट्रीय

Ayodhya Ram Temple Inauguration : डॉ. मनमोहन सिंग, देवेगौडा, सोनिया गांधी, खर्गेंना निमंत्रण

Arun Patil

अयोध्या, वृत्तसंस्था : काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि एच. डी. देवगौडा यांना अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वतीने देण्यात आले. लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनाही निमंत्रण देण्यात आले. तथापि, काँग्रेसचे नेते समारंभात सहभागी होतील की नाही, हे अद्याप निश्चित नाही.

अयोध्येत 22 जानेवारी रोजी होणार्‍या या कार्यक्रमाचे मुख्य यजमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत. त्यांच्या हस्तेच प्राणप्रतिष्ठेची मुख्य पूजा होणार आहे. अन्य विरोधी पक्षांतील नेत्यांनाही निमंत्रणे देण्यात येणार आहेत.

सोनिया गांधी सकारात्मक!

दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी सांगितले की, सोनिया गांधी सकारात्मक आहेत. त्या या कार्यक्रमाला जातील किंवा त्यांच्या वतीने शिष्टमंडळ जाईल. काशी विश्वनाथ, वैष्णो देवी यांसारख्या मंदिरांचे प्रमुख, बौद्ध धर्मगुरू दलाई लामा, माता अमृतानंदमयी (केरळ), योगगुरू बाबा रामदेव, अभिनेत्री माधुरी दीक्षित, इस्रोचे संचालक नीलेश
देसाई यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.

मुख्य पुजारी सत्येंद्र दासजी

अयोध्या, वृत्तसंस्था : अयोध्येत एका अर्थाने कैद असलेल्या कथित बाबरी परिसरात रामलल्ला एकांतवासात होते, तेव्हापासून त्यांच्या उपासनेतील कर्मकांडांत पुरोहित सत्येंद्र दासजी यांनी कधीही खंड पडू दिला नाही. गेली 32 वर्षे ते 100 रुपये महिना मानधनावर रामलल्लाची अव्याहत पूजा करत आले. आता भव्य मंदिर साकार झाल्यानंतरही नियमित पूजेसाठी पन्नास पुजार्‍यांचे मुख्य पुरोहित म्हणून पंडित सत्येंद्र दास यांचीच निवड झाली आहे. बाबरी पडली तेव्हा त्यांनीच रामलल्लाला सुरक्षित ठिकाणी उचलून नेले होते. सत्येंद्र दासजी यांनी बालपणीच सन्यास घेतला होता. नंतर त्यांनी संस्कृतचे सहायक अध्यापक म्हणून नोकरीही केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT