नवी दिल्ली : दोन दशकांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना बुधवारी अटक करण्यात आली. इंटरपोलच्या रेड नोटीसनंतर दोघांनाही थायलंड आणि अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले आणि भारतातील विमानतळावर पोहोचताच त्यांना अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींवर कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये जनार्दन सुंदरम आणि वीरेंद्रभाई मणिभाई पटेल यांचा समावेश आहे.
सीबीआयच्या मागणीवरून इंटरपोलने दोघांविरुद्ध रेड नोटीस जारी केली होती. सीबीआयच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, तामिळनाडू पोलिसांच्या विनंतीवरून सीबीआयला २१ जून २०२३ रोजी इंटरपोलकडून त्यांच्याविरुद्ध रेड नोटीस जारी करण्यात आली होती.
जनार्दन सुंदरमवर पॉन्झी योजनेद्वारे गुंतवणूकदारांची ८७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. जनार्दनने तामिळनाडूमध्ये वांटेड होता आणि अनेक लोकांची फसवणूक केल्यानंतर तो परदेशात पळून गेला होता. रेड नोटीस जारी झाल्यानंतर जनार्दनला बुधवारी थायलंडमधील बँकॉक येथून हद्दपार करण्यात आले आणि भारतातील कोलकाता विमानतळावर पोहोचताच त्याला ताब्यात घेण्यात आले. जनार्दनला अटक करण्यासाठी तामिळनाडू पोलिसही कोलकाता येथे पोहोचले आणि ते जनार्दनला घेऊन तामिळनाडूला रवाना झाले.
दुसऱ्या एका कारवाईत सीबीआयच्या ग्लोबल ऑपरेशन्स सेंटरने गुजरात पोलिस आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या सहकार्याने अहमदाबाद विमानतळावर एक कारवाई केली. या कारवाईत गुजरातमधील वीरेंद्रभाई मणिभाई पटेल याला अटक करण्यात आली. तो २० वर्षांपासून वांटेड होता. आणंद येथील चरोतर नागरिक सहकारी बँकेची ७७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप पटेलवर आहे. पटेल या सहकारी बँकेचा संचालक होता आणि २०२२ मध्ये पोलिसांनी त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. इंटरपोलने त्याच्याविरुद्ध ३ मार्च २००४ रोजी रेड नोटीस जारी केली होती. २९ जानेवारी २०२५ रोजी अमेरिकेहून अहमदाबाद विमानतळावर पोहोचताच पटेलला अटक करण्यात आली आणि नंतर गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.