Inspirational Marathi Women Pudhari
राष्ट्रीय

Women's Day 2026 | आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्राचं नाव देशात मोठं करणाऱ्या मराठी महिला

जागतिक महिला दिन विशेष

पुढारी वृत्तसेवा

Inspirational Marathi Women

प्रशांत वाघाये

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मराठी महिलांनी देशात आपल्या कार्यकर्तृत्वाचा विशेष ठसा उमटवला आहे. प्रशासन, राजकारण, परराष्ट्र सेवा, अर्थव्यवस्था आणि सामाजिक क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करत या महिलांनी महाराष्ट्राचे नाव देशपातळीवर उंचावले आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांच्या योगदानाचा हा विशेष आढावा.

१) विजया रहाटकर

अध्यक्षा, राष्ट्रीय महिला आयोग

विजया रहाटकर सध्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील महापौर, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, भाजपमध्ये राष्ट्रीय सचिव, महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, राजस्थान भाजपच्या प्रभारी आणि आता राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा असा चढता आलेख त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आहे. राष्ट्रीय महिला आयोगाला त्यांच्या रूपाने एक सक्षम नेतृत्व मिळाले. आयोगाच्या माध्यमातून महिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून देणे, देशभरात विविध ठिकाणी जनसुनावणी सारखे उपक्रम घेणे, सर्व प्रकरणे लवकर निकाली काढणे या गोष्टी प्रामुख्याने त्यांच्या नेतृत्वात केल्या जात आहे. यासह 'तेरे मेरे सपने' नावाने विवाहपूर्व संवाद केंद्र, राष्ट्रीय महिला आयोग आपल्या द्वारी अशा वेगवेगळ्या योजना त्यांनी विशेषकरून अमलात आणल्या. त्यांची अंमलबजावणी देशभरात प्रभावीपणे व्हावी, यासाठी स्वतः लक्ष घातले. यंदाच्या महिलादिनी त्यांनी राष्ट्रीय स्तरावर महिला प्रश्न सोडवण्यासाठी देशव्यापी जनसुनावणी कार्यक्रम हाती घेतला आहे.

२) रक्षा खडसे

केंद्रीय युवक कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री

रक्षा खडसे या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात केंद्रीय युवक कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्या जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा क्षेत्राचे सलग तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करत आहेत. केंद्रीय युवक कार्यक्रम व क्रीडा विभागाच्या राज्यमंत्री म्हणून त्या देशभर दौरे करून विविध क्रीडा योजनांचा तसेच युवकांसाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेतात आणि त्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अलीकडेच त्यांनी क्रीडा क्षेत्रातील महिलांच्या सहभागाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली असून सर्व क्रीडा प्रशिक्षकांमध्ये महिला प्रशिक्षकांना ३३ टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे क्रीडा क्षेत्रात महिलांना अधिक संधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून सुरू झालेला त्यांचा सार्वजनिक जीवनातील प्रवास पुढे जिल्हा परिषदेत आणि आज देशाच्या संसदेत खासदार आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री म्हणून प्रभावीपणे पुढे आला आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत स्थानिक स्तरावरील नेतृत्वापासून राष्ट्रीय पातळीवरील जबाबदाऱ्यांपर्यंतचा प्रवास उल्लेखनीय आहे. त्यांच्या मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, तसेच महिलांना अधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने त्या सातत्याने पुढाकार घेत आहेत. अलीकडेच महिला दिनाच्या निमित्त त्यांनी क्रीडा क्षेत्रातील महिलांच्या सहभागाला चालना देण्यासाठी 'अस्मिता महिला क्रीडा लीग'ची विशेष आवृत्ती जाहीर केली असून, ग्रामीण भागातील २.५ लाख मुली यात सहभागी होणार आहेत.

३) सुप्रिया देवस्थळी

सहमहालेखानियंत्रक, भारत सरकार

सुप्रिया देवस्थळी दिलीस्थित नामवंत मराठी अधिकारी (आयसीएएस) असून भारत सरकारच्या सहमहालेखानियंत्रक म्हणून कार्यरत आहेत. मूळच्या सिंधुदुर्गातील असलेल्या सुप्रिया देवस्थळी यांनी शिक्षण मुंबईतून पूर्ण केले. मार्च २०१८ पासून त्या दिल्लीत आहेत. त्यापूर्वी त्यांनी मुंबईसह राज्यात सेवा दिलेली आहे. आयसीएएस असोसिएशनच्या त्या विद्यमान अध्यक्षा आहेत. विशेष म्हणजे या असोसिएशनच्या स्थापनेपासून त्या पहिल्या महिला अध्यक्षा आहेत. यूपीएससीची सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी त्या मार्गदर्शन करतात. साहित्य क्षेत्रात रुची असलेल्या सुप्रिया देवस्थळी विविध विषयांवर लिखाण करत असतात. विविध वर्तमानपत्रात आणि दिवाळी अंकातही त्या सलग लिहित असतात. दिल्लीस्थित मराठी अधिकाऱ्यांची संस्था पुढचं पाऊल, दिल्ली मराठी प्रतिष्ठान यांच्यातही त्या सक्रीय आहेत. दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या दशकपूर्ती दिवाळी अंकाच्या संपादकांपैकी त्या एक आहेत. दिल्लीत होत असलेल्या मराठी महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनाच्या त्या स्वागताध्यक्षा आहेत.

४) प्रतिभा पारकर

संयुक्त सचिव, परराष्ट्र मंत्रालय

प्रतिभा पारकर या भारतीय परराष्ट्र सेवेतील वरिष्ठ अधिकारी आहेत. सध्या त्या परराष्ट्र मंत्रालयात नवी दिल्ली येथे संयुक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत. मूळच्या मुंबईच्या असलेल्या प्रतिभा पारकर यांनी सन २००० मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी मॉस्को येथील भारतीय दूतावासात राजनैतिक अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर जकार्ता येथे भारतीय दूतावासात प्रथम सचिव तसेच वाणिज्य प्रतिनिधी म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. पुढे न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनमध्ये सल्लागार म्हणून काम करताना संयुक्त राष्ट्र या आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचे प्रतिनिधित्व केले. तसेच फ्रँफर्ट येथे भारताच्या वाणिज्य दूतावासात महावाणिज्यदूत म्हणून त्यांनी सेवा दिली, तर पुढे अंगोला येथे भारताच्या राजदूत म्हणूनही त्यांनी काम पाहिले. या विविध जबाबदाऱ्यांदरम्यान त्यांनी भारताचे द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी काम केले. व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्य वाढावे यासाठी विविध व्यावसायिक कार्यक्रम, परिसंवाद आणि उद्योगपर उपक्रमांद्वारे भारतीय कंपन्यांना मार्गदर्शन केले. तसेच भारतीय सण, योग कार्यक्रम आणि भारतीय समुदायाच्या सहभागातून सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्याचेही प्रयत्न केले. परदेशात सेवा देताना कोरोना काळात तसेच इतर संकटकाळात विविध देशांत अडकलेल्या भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. ऑगस्ट २०२३ मध्ये त्या भारतात परतल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत. युपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शनही करतात.

५) धनश्री देशमुख

सनदी लेखापाल, संचालक, स्वदेश्री ॲडव्हायजरी सर्विसेस

धनश्री देशमुख दिल्लीस्थित सनदी लेखापाल आहेत. मूळच्या नाशिकच्या असलेल्या धनश्री देशमुख स्वदेश्री ॲडव्हायजरी सर्विसेस कंपनीच्या संचालक आहेत. महिला सक्षमीकरणासाठी देखील या संस्थेअंतर्गत काम केले जाते. २० पेक्षा अधिक कर्मचारी या ठिकाणी काम करतात. यामार्फत धनश्री देशमुख आणि त्यांच्या सहकारी आयकर भरणे यासह इतर आर्थिक कामाच्या बाबतीत मार्गदर्शन करतात. अर्थसंकल्पासंदर्भातही त्या मार्गदर्शन आणि विश्लेषण करतात. भारतभरातील महिला उद्योजक आर्थिक स्वावलंबन आणि अंतरिक समतोल साधून आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत २०४७ या राष्ट्रीय दृष्टीकोनाशी सुसंगत प्रगती करतील, ही त्यांची कल्पना आहे. या पार्श्वभूमीवर कर व गुंतवणूक सल्ला, व्यवसाय स्थापन मार्गदर्शन, भांडवल व अनुदान मिळविण्यासाठी सहाय्य (मुद्रा, स्टँड अप इंडिया आणि इतर शासकीय योजना), निवृत्ती आणि मातृत्व नियोजन, तसेच आंतरराष्ट्रीय/एनआरआय कर सल्ला अशा एकात्मिक सेवा दिल्या जातात. स्वदेश्रीचे वैशिष्ट्य म्हणजे सनदी लेखापाल स्तरावरील सखोल आर्थिक तज्ज्ञता, कोचिंग आणि कायदेशीर जागरूकता यांचा एकत्रित वापर करून उद्देशपूर्ण महिला उद्योजिकांना सक्षम करणे आहे. देशभरातील महिलांना सेवा पुरवते. याशिवाय दिल्लीतील विविध सार्वजनिक कार्यक्रमात त्या आवर्जून सहभागी असतात. मागील काही वर्षात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, भरत जाधव यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी अतिशय उत्तम केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT