International Day of Yoga 2025
विशाखापट्टणम : आज दिव्यांग बांधव ब्रेल लिपीत योगशास्त्राचे अध्ययन करतात, शास्त्रज्ञ अंतराळात योगाचे सराव करतात, तरुण मित्र गावागावांत योग ऑलिंपियाडमध्ये सहभागी होतात. नौदलाच्या सर्व जहाजांवर अप्रतिम योग सत्रांचे आयोजन झाले आहे. ओपेरा हाऊसच्या पायऱ्यांपासून ते एव्हरेस्टच्या शिखरापर्यंत आणि विशाल समुद्रापर्यंत एकच संदेश आहे की, योग सर्वांसाठी आहे. सर्व सीमा आणि क्षमतेच्या पलीकडे योग आहे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचे महत्व विशद केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) येथे योग सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनीही सहभाग घेतला. यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना 'एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग' अशी आहे. याबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "या वर्षीची थीम एक मौल्यवान सत्य सांगते. पृथ्वीवरील प्रत्येक घटकाचे आरोग्य परस्परांशी निगडित आहे. माणसांचे आरोग्य त्या मातीवर अवलंबून आहे जिथे अन्न तयार होते, त्या नद्यांवर जे आपल्याला पाणी पुरवतात, त्या प्राण्यांवर जे आपल्यासोबत परिसंस्थेत राहतात आणि त्या वनस्पतींवर ज्या आपल्याला पोषण देतात. योग आपल्याला या परस्परसंबंधांची जाणीव करून देतो, आपल्याला जगाशी एकरूप होण्याचा मार्ग दाखवतो आणि शिकवतो की आपण स्वतंत्र व्यक्ती नाही, तर निसर्गाचा भाग आहोत."
सध्याच्या जागतिक परिस्थितीवर भाष्य करताना पंतप्रधान म्हणाले, "दुर्दैवाने आज जगभरात तणाव, अस्थिरता आणि अस्वस्थता वाढत आहे. अशा काळात योग आपल्याला शांततेचा मार्ग दाखवतो. योग मानवतेसाठी आवश्यक आहे, जो आपल्याला श्वास घेण्यास, समतोल साधण्यास आणि पुन्हा एकदा पूर्णत्वाकडे जाण्यास मदत करतो."
जगात योगाचा प्रसार करण्यासाठी, भारत आधुनिक संशोधनाद्वारे योगशास्त्राला अधिक बळकटी देत आहे. देशातील मोठ्या वैद्यकीय संस्था योगावर संशोधन करत आहेत. आधुनिक वैद्यकीय व्यवस्थेत योगाच्या वैज्ञानिक पैलूमध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न आहे, असे मोदी म्हणाले. या आंतरराष्ट्रीय योग दिनाला मानवतेसाठी योगाची सुरुवात करा. हा दिवस आंतरिक शांती ही एक जागतिक धोरण बनू दे, जिथे योग केवळ वैयक्तिक सराव म्हणून नव्हे तर जागतिक भागीदारी आणि एकतेसाठी एक शक्तिशाली साधन म्हणून स्वीकारला जाईल. प्रत्येक देश आणि प्रत्येक समाजाने योगाला एक सामायिक जबाबदारी बनवावी आणि सामूहिक कल्याणासाठी एक सामान्य योगदान द्यावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. विशाखापट्टणम येथे या योग कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्यासोबत मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले.