नवी दिल्ली/मस्कत; वृत्तसंस्था : भारताच्या समृद्ध आणि प्रगत सागरी वारशाचे जिवंत प्रतीक असलेल्या ‘आयएनएस व्ही कौंडिण्य’ या हाताने विणलेल्या ऐतिहासिक जहाजाने ओमानच्या मस्कत बंदरापर्यंचा प्रवास बुधवारी यशस्वीरीत्या पार केला. 17 दिवसांच्या खडतर आणि रोमांचक प्रवासानंतर हे जहाज मस्कतमध्ये दाखल झाले. त्याला वॉटर सॅल्यूट देण्यात आला. भारतीय नौदल आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात आली.
या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे संकल्पक आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव संन्याल हे स्वतः या जहाजावर उपस्थित होते. हा प्रकल्प केवळ एक सागरी सफर नसून, भारताच्या प्राचीन नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे जगासमोर केलेले एक प्रदर्शन आहे.
पहिल्या शतकात कंबोडियापर्यंत प्रवास करून तेथील संस्कृतीशी नाते जोडणार्या महान भारतीय खलाशी कौंडिण्य यांच्या स्मरणार्थ या जहाजाचे नामकरण करण्यात आले. ही मोहीम भारत आणि ओमान यांच्यातील 5,000 वर्षांहून अधिक जुन्या व्यापारी आणि मैत्रीपूर्ण संबंधांना उजाळा देणारी ठरली आहे. दोन वर्षांपूर्वी ओमानच्या सुलतानांनी भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करताना या संयुक्त उपक्रमाची घोषणा केली होती. त्याची पूर्तता या प्रवासाने झाली आहे.
या जहाजाच्या बांधणीत एकाही लोखंडी खिळ्याचा वापर करण्यात आलेला नाही. प्राचीन भारतीय जहाज बांधणी कलेचा वारसा जपत, हे जहाज लाकडी फळ्या, नारळाच्या काथ्यापासून बनवलेल्या दोरीने शिवून तयार केले गेले आहे. गोव्यातील होडी इनोव्हेशन्स आणि केरळमधील मुख्य शिपराईट बाबू संकरन यांच्या कुशल कारागिरांनी अजिंठा लेण्यांमधील चित्रांनुसार हे जहाज साकारले आहे. हे जहाज पूर्णपणे वार्याच्या वेगावर आणि शिडांच्या साहाय्याने चालते. डिंक आणि नारळाच्या तंतूंचा वापर करून हे जहाज जलरोधक बनवण्यात आले आहे.