नवी दिल्ली : जगातील सर्वात प्रगत आणि प्राचीन समजल्या जाणार्या सिंधू संस्कृतीचा अंत नेमका कसा झाला, हा इतिहासकार आणि पुरातत्त्व शास्त्रज्ञांसाठी अनेक दशकांपासून एक कूटप्रश्न राहिला आहे. मात्र, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका नवीन संशोधनाने या रहस्यावरून पडदा उघडला असून, सिंधू संस्कृतीचा र्हास कोणत्याही युद्धाने किंवा आक्रमणामुळे झाला नसून निसर्गाचा कोप व दुष्काळामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कम्युनिकेशन्स अर्थ अँड एन्व्हायर्न्मेंट या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, सिंधू संस्कृतीच्या विनाशाला शतकानुशतके पडलेला भीषण दुष्काळ कारणीभूत ठरला. संशोधनात असे दिसून आले आहे की, त्या काळात वारंवार उद्भवलेल्या कोरड्या हवामानामुळे पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले होते. हा दुष्काळ एखाद-दोन वर्षे नव्हे, तर सलग अनेक दशके आणि काही ठिकाणी तब्बल 100 वर्षांहून अधिक काळ टिकला होता.
हवामानबदलाचा फटका
या संशोधनात स्पष्ट करण्यात आले आहे की, दीर्घकाळ चाललेल्या या दुष्काळामुळे पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटले आणि संसाधनांवर मोठा ताण पडला. परिणामी, शेतीवर अवलंबून असलेल्या या संस्कृतीतील समुदायांना अन्नासाठी आणि जगण्यासाठी स्थलांतर करणे भाग पडले. मोठ्या शहरी वस्त्या सोडून लोकांनी सिंधू नदीच्या आसपासच्या प्रदेशात आश्रय घेतला. यामुळे ही प्रगत संस्कृती हळूहळू लोप पावत गेली.
आक्रमणाचा सिद्धांत ठरला फोल
आतापर्यंत अनेक इतिहासकारांनी असा दावा केला होता की, परकीय आक्रमणे किंवा मोठ्या साथीच्या रोगांमुळे ही संस्कृती नष्ट झाली असावी. मात्र, या नवीन हवामान अभ्यासामुळे हे सर्व दावे मागे पडले आहेत. सिंधू संस्कृतीचा हा अंत अचानक झालेला नसून, तो हवामानातील बदलांमुळे झालेला एक धोरणी आणि संथ स्वरूपाचा र्हास होता, असे संशोधकांनी म्हटले आहे.
मानवी इतिहासातील सर्वात शिस्तबद्ध आणि प्रगत मानल्या जाणार्या या संस्कृतीचा अंत हा आधुनिक जगासाठी हवामान बदलाच्या धोक्याची एक मोठी चेतावणी असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
काय सांगते हे नवीन संशोधन?
भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) गांधीनगर आणि अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडो बोल्डर येथील संशोधकांच्या पथकाने इसवी सन पूर्व 3000 ते 1000 या कालखंडातील हवामानाचा सखोल अभ्यास केला. यासाठी त्यांनी गुहांमधील चुनखडीचे अवशेष आणि तलावांमधील पाणी पातळीच्या नोंदींचा आधार घेतला.
सिंधू संस्कृतीचा अंत कोणत्याही एका घटनेमुळे झाला नाही. इसवी सन पूर्व 2425 ते 1400 या काळात एकूण चार मोठे दुष्काळ पडले. यात सर्वात भयानक दुष्काळ इसवी सन पूर्व 1733 च्या सुमारास सुरू झाला, जो तब्बल 164 वर्षे टिकला. या काळात पावसाचे प्रमाण 10 ते 20 टक्क्यांनी घटले आणि तापमानात वाढ झाली. यामुळे नद्या आणि जमीन कोरडी पडली.