नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये दुसऱ्या दिवशी, शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी, तालकटोरा स्टेडियम मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडपामध्ये निमंत्रित कवींनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. निमंत्रित ४२ कवींनी शेतकऱ्यांच्या व्यथा, आई-बाप, स्त्री सशक्तीकरण यासह विविध विषयावरील कविता मांडल्या. या कवी संमेलनाचे अध्यक्ष इंद्रजीत भालेराव यांनी त्यांची शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी "दार उघड दिल्ली दार उघड" ही कविता मांडून शेतकऱ्यांचा आंदोलनाचा प्रश्न राजधानीत मांडला. या कवी संमेलनामध्ये महाराष्ट्र बाहेर बंगळुरू, दिल्ली आणि राजधानी परिसर, हैदराबाद या विविध ठिकाणी राहणाऱ्या कवींनी कविता मांडल्या. (Delhi Marathi Sahitya Sammelan)
कवी संमेलनाचे अध्यक्ष इंद्रजीत भालेराव म्हणाले की, मोठ्या अडथळ्याची शर्यत पार पडून कवी संमेलन पार पडत आहे. दरवर्षीच्या कवी संमेलनापेक्षा यंदा प्रतिसाद चांगला आहे. दिल्लीकर खूप चांगला प्रतिसाद देत आहेत. ४२ वर्षांपासून संमेलन अनुभवत आहे. १९८२ मधे अंबाजोगाई पासून ते यंदाचे राजधानी दिल्लीतील सगळी संमेलन अनुभवली आहेत. १९९३ साली वि. दा. करंदीकराच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात झालेले संमेलन तेव्हापासून मागच्या ३२ वर्षापासून संमेलनात कविता सादर करत आहे, असे ते म्हणाले. ३ वेळेस कवी संमेलनचे अध्यक्षपद भूषवले आहे, असे ते म्हणाले. कवी संमेलनातून पुढे आलेले कवी गाजतात, साहित्य संमेलनाने मला पुढे आणलेच आणि संमेलनात मांडलेल्या कविता गाजल्या, असे ते म्हणाले. साहित्य संमेलनाने कवी आणि कविता घडत असतात, असे ते म्हणाले.
इंद्रजीत भालेराव म्हणाले की, पंचवीस वर्षांपूर्वी शरद जोशींनी तालुका तालकटोरा स्टेडियमवर शेतकऱ्यांचा मोठा आंदोलन केलं होतं. तेव्हापासून शेतकरी दिल्लीला धडका मारतो आहे. मागच्या २५ वर्षापासून शेतकरी दिल्लीला धडका मारतो आहे. नव्हे नव्हे मागच्या ३५० वर्षापासून शेतकरी राजधानीला धडाका मारत आहे , ते म्हणाले. दिल्लीच्या सीमेवर तो उपोषणाला बसलेला आहे आणि या शेतकऱ्याला दिल्ली प्रवेश देत नाही.
"तोडो दिल्ली के कांगोरे" म्हणत चारशे वर्षे पूर्वी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी पंजाबच्या लोकांनी दिल्लीवर आक्रमण केले होते. तेव्हा औरंगजेबाने शेतसारा माफ केला. आजही पंजाबचा शेतकरी दिल्लीवर आक्रमण करतो आहे. पण दिल्लीच्या सीमा आणखी कठोर झाले आहेत. दिल्लीचे खंदक अधिक जीव घेणे झाले आहेत. असे ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणाच्या शेवटी त्यांनी "दार उघड दिल्ली दार उघड, बळी आला दारी आता दार उघड" ही कविता मांडून बळीराजाची व्यथा अध्यक्ष इंद्रजीत भालेराव यांनी त्यांच्या शब्दातून मांडले. दिल्ली शेतकऱ्यांसाठी किती क्रूर आहे याची शब्दांतून त्यांनी मांडणी केली.
कवी संमेलनाची सुरुवात रसिका देशमुख यांच्या विठुरायावरील कवितेने झाली. त्यानंतर एकविसाव शतक आलं तरी "कुणब्याची तीच गत, कवा होईल ज्ञानबराव आपली परगती", अशा शब्दांत कवी महेश मोरे यांनी व्यथा मांडली.
प्रशांत झिलपे यांनी त्यांच्या कवितेच्या ओळीतून राजकीय सद्यस्थितीवर फटकेबाजी केली. ते म्हणाले की, "कमळ काय पंजा काय सगळेच आहेत सेम, भात्यात बाण नसतानाही धनुष्य करतो नेम, घड्याळ घालून हातात शेट्टी करतोय गट्टी आणि रायगडावर थांबूनच इंजिन मारतोय शिट्टी, राजीनामे वागवून मंत्र्यांचे खिसे गेले फाटून, पाणी दुष्काळावर कोणीच करेनाबात कोणालाही निवडून द्या ठरलेला आमचाच घात." अशा कडक शब्दांत त्यांनी राजकारण मांडले. योजनांचा पाऊस ही कविता मांडताना ते म्हणाले की, "योजनांच्या पावसाला लाभार्थी मेल्यावर द्यायचा ठरवले जाते, पाऊस तिरंगी आहे तो कधी भगवा कधी मतांसाठी निळा ही होतो, हा पाऊस विठ्ठलाच्या कपाळावरील टिळाही होतो."
कवी शैलजा कारंडे यांनी शेतकऱ्यांच्या मुलींवरील कविता मांडली. "कुणब्याच्या या पोरी म्हणून तर हिरकण्या होतात, एका हातात पाळण्याची दोरी एका हातात भाकरी भाजत असतात, एका हातात घेऊन लेखणी घेतात सावित्रीचा वसा, एका हातात तलवार घेऊन चालवतात जिजाऊंचा वारसा, गल्ली सांभाळत सांभाळत दिल्ली सांभाळायची करतात तयारी" कवी नामदेव कोळी यांनी शेतकऱ्याच्या मुलाची अवस्था मांडणारी कविता मांडली.
कवी नीलम माणगावे यांनी साहित्य आणि शब्दांवर कविता मांडली. "सगळ्याच कविता आता मुक्या झाल्या आहेत, कथा आतल्या आत गुदमरत आहेत, बाकी सगळ लेखन अंग चोरून उभं आहे. असच होत राहील तर समजायला हरकत नाही शब्दांचे मरण अटळ आहे, जगण्यासाठी लेखण्यांना लावली पाहिजे धार" अशा शब्दांत नीलम माणगावे यांनी लेखक साहित्याची स्थिती मांडली. मंदा नांदुरकर यांनी आदिवासींच्या बोलीतील कविता मांडली. "महुआ" या कवितेतून त्यांनी आदिवासी स्त्रियाची फुले वेचताना होणारी धावपळ यावर भाष्य केले. तर "बाप कुणाला कळला नाही" ही कविता कवी राजेंद्र सोमवंशी यांनी मांडली.
यासह विविध विषयावरील कविता मांडून कवींनी उपस्थितांचे हृदय जिंकले. साहित्य रसिकांनी या निमंत्रितांच्या कवी संमेलनाला चांगली दाद दिली.