पुढारी ऑनलाईन : देशाची राजधानी दिल्लीमध्ये प्रसिद्ध गायक Guru Randhawa यांच्या मालकीच्या जिमबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर कुख्यात Lawrence Bishnoi टोळीने कथित ऑडिओ क्लिप आणि सोशल मीडियावरील पोस्टद्वारे या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला आहे.
दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या कथित ऑडिओमध्ये टोळीच्या एका सदस्याचा आवाज असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामध्ये गुरु रंधावा यांचे अभिनेता Salman Khan यांच्याशी जवळचे संबंध असल्याने त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच हा हल्ला केवळ “ट्रेलर” असल्याचेही त्या ऑडिओमध्ये सांगितले गेले आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जिमबाहेरील दृश्ये आणि सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू करण्यात आला आहे. हा हल्ला खरोखरच बिश्नोई टोळीने केला आहे की कोणीतरी दहशत निर्माण करण्यासाठी त्यांच्या नावाचा वापर केला आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिप आणि पोस्टची सत्यता तपासली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणाचे खरे स्वरूप समोर येईल.
दिल्ली पोलिसांचे अधिकृत निवेदन
दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, “११ जून २०२६ रोजी पहाटे पश्चिम विहार पूर्व पोलीस ठाण्यातील पुष्कर एन्क्लेव्ह परिसरातील ‘24 आवर्स फिटनेस’ जिममध्ये गोळीबार झाल्याची पीसीआर कॉलद्वारे माहिती मिळाली. प्राथमिक तपासात असे आढळून आले की, चेहरा कापडाने झाकलेल्या दुचाकीस्वार दोन अज्ञात व्यक्तींनी जिमच्या काचांवर काही फेऱ्या गोळीबार केला.
या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. स्थानिक पोलीस आणि जिल्हा पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली असून कायदेशीर प्रक्रिया राबवली जात आहे. आरोपींची ओळख पटवणे, त्यांचा शोध घेणे आणि त्यांना लवकरात लवकर अटक करण्यासाठी अनेक पथके नियुक्त करण्यात आली आहेत.”