IndiGo Flight emergency landing : कोलकाताहून चेन्नईकडे येणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे मंगळवारी (दि. 11 ऑगस्ट) रात्री हवेतच इंजिन बंद पडल्याची खळबळजनक घटना घडली. विमानाची ही आपत्कालीन परिस्थिती पाहता चेन्नई विमानतळावर तातडीने 'फुल इमर्जन्सी' (पूर्ण आणीबाणी) जाहीर करण्यात आली. लँडिंगच्या अगदी काही वेळ आधी विमानाचे डावे इंजिन अचानक बंद पडले होते. मात्र, पायलटने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सर्व २२४ प्रवाशांचे प्राण बचावले आहेत.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (AAI) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलकाताहून चेन्नईला येणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E-723 या विमानाने ११ ऑगस्टच्या रात्री ११:२९ वाजता पूर्ण आणीबाणी जाहीर केली. या विमानात चालक दलासह एकूण २२४ प्रवासी होते.
हे विमान रात्री ११:३० वाजता चेन्नई विमानतळावर उतरणे अपेक्षित होते. मात्र, लँडिंगची तयारी करत असतानाच डावे इंजिन निकामी झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. वैमानिकाने तातडीने याची माहिती एअर ट्रॅफिक कंट्रोलला (ATC) दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून विमानतळ प्रशासनाने तातडीने आपत्कालीन यंत्रणा सज्ज केली.
सर्व सुरक्षा उपाययोजनांनंतर हे विमान रात्री ११:३७ वाजता चेन्नई विमानतळाच्या धावपट्टी क्रमांक २५ वर सुरक्षितपणे उतरले. विमानातील सर्व २२४ प्रवासी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रात्री ११:४७ वाजता विमानतळावरील आणीबाणी मागे घेण्यात आली. या घटनेनंतर विमानतळावरील इतर उड्डाणे आणि कामकाज पूर्ववत व सुरळीत सुरू झाले.