नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशातील सेमीकंडक्टर क्षेत्रातील २८१ कंपन्यांनी १.४ अब्ज डॉलर्सचे इक्विटी फंडिंग (भांडवल) उभारले आहे. यापैकी जवळपास निम्मी रक्कम म्हणजेच ७०.१ कोटी डॉलर्स केवळ २०२५ पासून उभारले असल्याचे ट्रॅक्सनच्या अहवालात म्हटले आहे.
ही माहिती 'सेमिकॉन इंडिया २०२६' या देशातील सेमीकंडक्टर क्षेत्रातील प्रमुख परिषद आणि प्रदर्शनाच्या काही दिवस आधी समोर आली आहे. हा कार्यक्रम १७ ते १९ सप्टेंबरदरम्यान नवी दिल्लीतील द्वारका येथील 'यशोभूमी' येथे आयोजित केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबर रोजी 'सेमिकॉन इंडिया २०२६'च्या पाचव्या आवृत्तीचे उद्घाटन करतील. यात सेमीकंडक्टर उद्योगातील जगभरातील नेते, सरकारी अधिकारी, राज्यांचे प्रतिनिधी आणि क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्र येतील. भारत आपल्या वाढत्या सेमीकंडक्टर परिसंस्थेच्या गतीला या कार्यक्रमाद्वारे अधिक बळकट करेल.
या क्षेत्रात भारतात एकूण ३,५५७ कंपन्या कार्यरत आहेत, ज्यापैकी २८१ कंपन्यांना निधी मिळाला असून, त्यातील १४२ कंपन्यांनी इक्विटी फंडिंगद्वारे भांडवल उभारले आहे. ट्रॅक्सनच्या मते, २०२६ मध्ये आतापर्यंत या क्षेत्राने २२.८ कोटी डॉलर्सचा निधी मिळवला आहे. एकूण निधी उभारणीमध्ये टेसोलव्ह सेमीकंडक्टर २१.३ कोटी डॉलर्ससह आघाडीवर आहे. त्यानंतर इलजिन इलेक्ट्रॉनिक्स १९.८ कोटी डॉलर्स आणि व्हीव्हीडीएन १२.९ कोटी डॉलर्स यांचा क्रमांक लागतो.
...ही शहरे आघाडीवर
बंगळूर हे सेमीकंडक्टर गुंतवणूक आकर्षित करण्यात आघाडीवर असून येथे या क्षेत्रातील ३,५५७ पैकी ६२६ कंपन्या (एकूण कंपन्यांच्या सुमारे १८ टक्के) स्थित आहेत. आतापर्यंत उभारलेल्या एकूण इक्विटी फंडिंगपैकी ४०.१ टक्के वाटा याच शहराचा आहे. निधीच्या वाट्यातील (फंडिंग शेअर) हिश्श्यानुसार नोएडा (१६.४ टक्के), गुरुग्राम (१०.७ टक्के), कोची (८.८ टक्के) आणि हैदराबाद (६.२ टक्के) यांचा क्रमांक लागतो.