पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतातील JSW स्टील या पोलाद कंपनीने देशाच्या दृष्टीने अभिमानास्पद कामगिरी केली आहे. ही कंपनी पोलाद क्षेत्रातील जगातील सर्वाधिक बाजार मुल्य (Valuation) असलेली कंपनी बनली आहे.
भारतीय शेअर मार्केटमध्ये या कंपनीचे बाजारमुल्य (मार्केट कॅप) 30 अब्ज रूपयांहून अधिक झाले. सज्जन जिंदल यांच्या नेतृत्वाखालील या कंपनीने हा माईलस्टोन गाठला आहे. अर्थविषयक प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. (India's JSW Steel becomes world's highest-valued steelmaker)
मंगळवारी JSW स्टीलने अमेरिकेतील Nucor Corp ला मागे टाकले. त्यांचे बाजार भांडवल 29.92 अब्ज डॉलर होते. तर युरोपमधील Arcelor Mittal, जपानमधील Nippon Steel Corp आणि चीनमधील Baoshan Iron या जगातील प्रमुख पोलाद उत्पादक कंपन्यांचे बाजार भांडवल 21 अब्ज डॉलर ते 27 अब्ज डॉलरदरम्यान आहे.
जेएसडब्ल्यू स्टीलच्या इतर स्पर्धक भारतीय कंपन्या
JSW स्टील ही भारतातील सर्वात मोठे स्टील उत्पादक कंपनी आहे. तर देशात दुसऱ्या स्थानी टाटा स्टीलही कंपनी आहे. टाटा स्टीलचे बाजार भांडवल सुमारे $23 अब्ज डॉलर आहे. तर जिंदाल स्टीलचे बाजार मूल्य $ 10.81 अब्ज आहे.
सरकारी कंपनी SAIL चे बाजार भांडवल $ 5.5 अब्ज आहे. दरम्यान, गेल्याच आठवड्यात टाटा स्टील आणि SAIL या कंपन्यांनी 1 ते 5 टक्क्यांची वाढ नोंदवली होती. JSW Steel चा शेअर या वर्षात 18 टक्क्यांनी वधारला आहे. त्यामुळे तो Nifty 50 निर्देशांकातील आघाडीच्या शेअर्सपैकी एक ठरला आहे.
1982 मध्ये स्थापन झालेली JSW Steel ही एक आघाडीची बहुराष्ट्रीय स्टील उत्पादक कंपनी असून JSW गटाची प्रमुख कंपनी आहे. मुंबई येथे मुख्यालय असलेल्या या कंपनीचा तोरणागल्लू (कर्नाटक) येथे एकात्मिक स्टील प्लांट आहे.
कंपनीने भारतभर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपले अस्तित्व वाढवले आहे. JSW Steel च्या उत्पादनांमध्ये फ्लॅट आणि लांब स्टील उत्पादने आहेत, जी ऑटोमोटिव्ह, कन्स्ट्रक्शन आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स यांसारख्या विविध उद्योगांसाठी वापरली जातात.
कंपनीची पोलाद उत्पादन क्षमता
JSW गटाची ही प्रमुख कंपनी विजयनगर, डोल्वी आणि सेलम येथे एकत्रित स्टील प्रकल्प चालवते, तसेच अमेरिका आणि इटलीमधील आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्सदेखील सांभाळते. सध्या, कंपनीची स्टील उत्पादन क्षमता 35.7 दशलक्ष टन आहे आणि सन 2028 च्या आर्थिक वर्षापर्यंत ती 43.5 मेट्रिक टन तर 2031 च्या आर्थिक वर्षापर्यंत 51.5 मेट्रिक टन करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.
JSW स्टीलचा शेअर भारतीय शेअर मार्केटमध्ये उत्तम कामगिरी करत आहे. मंगळवारी BSE वर हा शेअर 1074.15 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला होता. कंपनीच्या स्टॉकची किंमत एका महिन्यात साधारणपणे 11 टक्के तर एका आठवड्यात 4 टक्क्यांहून अधिक वाढली आहे.
दरम्यान, जिंदाल कुटुंबियांतील पार्थ जिंदाल यांनी X (ट्विटर) वर म्हटले आहे की, jswsteel ने बाजार भांडवलाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठी स्टील कंपनी बनली आहे. याचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे. @sajjanjindal पापा, मा @SangitaSJindal आणि संपूर्ण @TheJSWGroup कुटुंबाच्या मेहनतीबद्दल आम्हाला अभिमान आहे. आम्ही या टप्प्यावर थांबणार नाही."