पुढारी ऑनलाईन डेस्क: जम्मू आणि काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात रविवारी सकाळी ढगफुटीमुळे मुसळधार पाऊस पडला, ज्यामुळे पूर आणि भूस्खलन झाले. या भयानक आपत्तीत तीन जणांचा मृत्यू झाला, तर अनेक घरे, दुकाने आणि रस्ते उध्वस्थ झाले आहे. दरम्यान १०० हून अधिक लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ढगफुटी आणि भूस्खलनामुळे २५० किमी लांबीच्या जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. हा रस्ता काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारा एकमेव सर्व हवामान मार्ग आहे. टेकड्यांवरून पडणाऱ्या ढिगाऱ्यांमुळे नाशरी आणि बनिहाल दरम्यान सुमारे बारा ठिकाणी रस्ता बंद झाला, ज्यामुळे शेकडो वाहने अडकून पडली.
मतदकार्यासाठी लष्कराच्या आठ तुकड्या सज्ज
जम्मू आणि काश्मीरमधील रामबन येथे ढगफुटी झाल्यानंतर भारतीय लष्कराने मदत कार्य सुरू केले आहे. राष्ट्रीय महामार्ग-४४ वर अडकलेल्या प्रवाशांना अन्न, निवारा आणि वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी क्यूआरटी तैनात आहेत. लष्कराच्या आठ तुकड्या सज्ज आहेत आणि बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. सुरुवातीच्या अंदाजानुसार, रस्त्यांवरील ढिगारा साफ करण्यासाठी आणि वाहतूक पूर्ववत करण्यासाठी ४८ तास लागू शकतात.
पावसात तीन जणांचा मृत्यू
सिरी बागना गावात ढगफुटीच्या घटनेत आकिब अहमद (१२), त्याचा भाऊ मोहम्मद साकिब (१०) आणि त्यांचे शेजारी मुनी राम (६५) यांचा मृत्यू झाला. गावातील रहिवासी श्री हाफिज म्हणाले, 'पहाटे ४:३० वाजता ढग फुटण्याचा मोठा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर लगेचच आरडाओरडा झाला.' तो म्हणाला, 'आम्ही दोन्ही भावांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले, पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.'
वीज पडून दोघांचा मृत्यू
रियासी जिल्ह्यातील अर्नास भागात शनिवारी रात्री उशिरा वीज कोसळून एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. अशाप्रकारे, दोन दिवसांत पावसाशी संबंधित घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. रामबन जिल्ह्यात मुसळधार पाऊस, जोरदार वारे, गारपीट आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे, असे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.
अवकाळीने प्रचंड नुकसान
संततधार पावसामुळे धरमकुंड गावात पूर आला आणि सुमारे ४० घरांचे नुकसान झाले. यापैकी १० घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. पोलिसांनी १०० हून अधिक अडकलेल्या ग्रामस्थांना वाचवले. त्यांना एका सरकारी माध्यमिक शाळेत आश्रय देण्यात आला आहे, जिथे प्रशासनाकडून रेशन आणि आवश्यक मदत पुरवली जात आहे.
रामबनमधील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद
रामबनचे उपायुक्त बसीर-उल-हक चौधरी म्हणाले की, बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे आणि सर्व सरकारी संस्था, पोलिस, एसडीआरएफ, सैन्य, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक स्वयंसेवक मदत कार्यात गुंतले आहेत. त्यामुळे शाळा, महाविद्यालये आणि सरकारी संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत.