नवी दिल्ली : आंध्र प्रदेशात देशातील पहिली सोन्याची खाण लवकरच पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असल्याची माहिती डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेडने गुरुवारी दिली. दरवर्षी भारतात एक हजार टनांच्या आसपास सोन्याची आयात केली जाते.
कच्च्या तेलाच्या आयातीनंतर सर्वाधिक आयात होणार्या वस्तूंत सोने दुसर्या क्रमांकावर येते. डेक्कन गोल्ड माईन ही मुंबई शेअर बाजारात नोंदणी असलेली देशातील पहिली आणि एकमेव कंपनी आहे. आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील जोन्नागिरी येथे हा प्रकल्प असून त्यास नुकतीच पर्यावरणीय मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पातून वर्षाला 750 किलो सोने मिळेल. तसेच दोन ते तीन वर्षांनी दरवर्षी एक हजार टन सोने मिळेल. सध्या या खाणीतून दीड टन सोने मिळत आहे. कंपनी भारतासह किर्गिझस्तान, फिनलंड आणि टांझानिया येथे खनिज उत्खननाचे काम करते.