Bird Flu Vaccine | बर्ड फ्लूविरुद्ध पहिली स्वदेशी लस लवकरच होणार लाँच 
राष्ट्रीय

Bird Flu Vaccine | बर्ड फ्लूविरुद्ध पहिली स्वदेशी लस लवकरच होणार लाँच

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : वर्षानुवर्षांचे संशोधन आणि यशस्वी चाचण्यांनंतर, भारत लवकरच बर्ड फ्लू विरुद्धची आपली पहिली स्वदेशी लस लाँच करणार आहे. या ऐतिहासिक यशामुळे देशातील पोल्ट्री उद्योगात आनंदाचे वातावरण असून, वारंवार उद्‌भवणाऱ्या बर्ड फ्लूच्या साथींना आळा बसण्याची आशा निर्माण झाली आहे.

ही लस पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असून ती 'इनॲक्टिव्हेटेड एच५एन१ (क्लेड २,३.२.१ए)' प्रकारची आहे. देशात सध्या सक्रिय असलेल्या अतिसंसर्गजन्य एव्हियन इन्फ्लूएंझा विषाणूपासून ही लस पक्ष्यांचे संरक्षण करेल. अलीकडेच हा धोकादायक विषाणू सस्तन प्राण्यांसह मानवामध्येही (तीन रुग्ण) आढळून आला होता. २००६ ते २०२१ दरम्यान भारतातील २४ राज्यांत बर्ड फ्लूच्या ३४१ साथी आल्या, ज्यामध्ये २८४ प्रकरणे एच५एन१ विषाणूची होती. आतापर्यंत या विशिष्ट विषाणूवर कोणतीही लस उपलब्ध नव्हती.

पोल्ट्री उद्योग आणि अर्थव्यवस्थेचे रक्षण होणार

बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्यास बाधित पक्ष्यांचा मृत्यूदर जवळपास १०० टक्के असतो. त्यामुळे लाखो पक्षी नष्ट करावे लागतात. याचा फटका निर्यातीला बसून पोल्ट्री उत्पादनांचे दरही वाढतात. हा रोग अनियंत्रित पसरल्यास देशाच्या २० टक्क्यांहून अधिक कुक्कुटपालन क्षेत्राला धोका निर्माण होऊ शकतो आणि जीडीपी वाढीवर १.५ टक्क्यांपर्यंत परिणाम होऊ शकतो. २००६ च्या साथीमध्ये भारताला २,२०० ते ३,००० कोटी रुपयांचा फटका बसला होता.

‘आत्मनिर्भर भारता’च्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

भोपाळ येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीजेस' (आयसीएआर-निशाद) मधील शास्त्रज्ञांनी ही लस विकसित केली आहे. संस्थेचे संचालक अनिकेत सन्याल यांनी सांगितले की, पशुपालन क्षेत्रातील जैविक औषधांमध्ये 'आत्मनिर्भरता' आणण्यासाठी मैलाचा दगड आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT