Defense production India | संरक्षण उत्पादन १.७८ लाख कोटींवर 
राष्ट्रीय

India Defence Production | संरक्षण उत्पादन १.७८ लाख कोटींवर

गेल्यावर्षीच्या तुलनेत १५ टक्के वाढ; निर्यातीतही भारताचा डंका

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारताचे संरक्षण सामग्रीचे उत्पादन १.७८ लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. गतवर्षीच्या तुलनेत त्यात १५.६ टक्क्यांची वाढ झाली असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने बुधवारी दिली.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील आर्थिक वर्षातील १.५४ लाख कोटी रुपयांच्या संरक्षण सामग्रीची निर्मिती झाली होती. तसेच, २०२०-२१ मध्ये ८४,६४३ कोटी रुपयांचे संरक्षण उत्पादन झाले होते. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा १५.६ आणि गेल्या चार वर्षांत संरक्षण उत्पादनामध्ये तब्बल ११० टक्क्यांची प्रचंड वाढ झाली आहे. तसेच, भारत १०० हून अधिक देशांना ३८,४२४ कोटी रुपयांची संरक्षण उपकरणे निर्यात करतो आणि त्यातही गेल्या दहा वर्षांत २५ पट वाढ झाली आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, अलीकडच्या काळात भारताच्या संरक्षण उत्पादनात झालेली उल्लेखनीय वाढ म्हणजे ‘संरक्षण उत्पादन विभाग’ आणि इतर सर्व संबंधित घटकांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. ही वाढती वाटचाल देशाच्या विस्तारणाऱ्या संरक्षण औद्योगिक पायाचे स्पष्ट निदर्शक आहे. सातत्यपूर्ण धोरणात्मक पाठिंबा, अनेक नवीन उपक्रम, खासगी क्षेत्राचा वाढलेला सहभाग आणि वाढत्या निर्यात क्षमतांमुळे, संरक्षण उत्पादन क्षेत्र आगामी काळात आणखी वेगाने प्रगती करण्यास सज्ज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दृष्टिक्षेपात भारताची संरक्षण निर्यात

भारत १०० हून अधिक देशांना ३८,४२४ कोटी रुपयांची संरक्षण उपकरणे निर्यात करतो

यामध्ये अमेरिका, फ्रान्स आणि आर्मेनिया प्रमुख देश आहेत

अमेरिका सर्वात मोठा खरेदीदार

२०१६-१७ मध्ये संरक्षण उपकरणांची निर्यात केवळ १५२२ कोटी रुपये होती

एका दशकापेक्षा कमी वेळेत यात २५ पटीहून अधिक वाढ नोंदवली गेली आहे.

भारताने २०२९-३० पर्यंत ५० हजार कोटी रुपयांचे संरक्षण निर्यात लक्ष्य ठेवले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT