नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय नागरिकांना लक्ष्य करणारे बहुतेक सायबर हल्ले हे म्यानमार, कंबोडिया, व्हिएतनाम, लाओस आणि थायलंडसारख्या आग्नेय आशियाई देशांमधून होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या ‘इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर’ने (आयफोरसी) संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, या फसवणुकीमागे चिनी ऑपरेटर्सद्वारे चालवली जाणारी संघटित टोळी असून, भारतीयांना दरमहा तब्बल 1,500 कोटी रुपयांचा गंडा घातला जात आहे.
या सायबर गुन्हेगारांनी एक मोठे जाळे विणले असून, त्याचे थेट कनेक्शन भारताच्या शेजारील देशांशी जोडले गेले आहे, ज्यामुळे भारतीय तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आयफोरसी अशा नेटवर्कचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्था आणि स्थानिक कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सीसोबत मिळून काम करत आहे. यासोबतच, नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद ऑनलाईन योजनांपासून सावध राहावे आणि सायबर गुन्ह्यांची तक्रार राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तत्काळ करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
आयफोरसीच्या आकडेवारीनुसार, 2025 च्या पहिल्या सहा महिन्यांत (जानेवारी ते जून) भारतीयांचे सायबर फसवणुकीमुळे सुमारे 8,500 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. चिंताजनक बाब म्हणजे, यातील निम्म्याहून अधिक नुकसान हे आग्नेय आशियाई देशांमधून चालवल्या जाणार्या सायबर गुन्हेगारीमुळे झाले आहे. ही रक्कम मोठी असली तरी, 2024 च्या तुलनेत यात घट झाली आहे.