Indian Railways luggage rules
नवी दिल्ली: रेल्वेने प्रवास करताना अनेक प्रवासी गरजेपेक्षा जास्त बॅगा आणि ट्रंक सोबत घेऊन जातात. मात्र, यापुढे तुम्हाला जास्त सामान घेऊन प्रवास करता येणार नाही. कारण, विमान कंपन्यांच्या धर्तीवर, भारतीय रेल्वेने आता प्रवाशांसाठी सामानाची मर्यादा काटेकोरपणे लागू केली आहे.
जर तुम्ही विहित मर्यादेपेक्षा जास्त सामान घेऊन प्रवास करताना आढळलात, तर तिकीट तपासणीदरम्यान रेल्वेकडून तुमच्यावर मोठा दंड आकारला जाऊ शकतो. रेल्वेने स्पष्ट केले आहे की, हा नियम मासिक हंगामी तिकीट धारकांनाही समानरीत्या लागू होतो आणि त्यांना कोणतीही अतिरिक्त सवलत दिली जाणार नाही.
रेल्वेच्या नियमांनुसार, प्रवासी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय एका विशिष्ट वजनाच्या मर्यादेपर्यंत सामान सोबत नेऊ शकतात.
फर्स्ट एसी: ७० किलोपर्यंत मोफत.
सेकंड एसी: ५० किलोपर्यंत मोफत.
थर्ड एसी आणि एसी चेअर कार: ४० किलोपर्यंत मोफत.
स्लीपर कोच: ४० किलोपर्यंत मोफत.
जनरल कोच: ३५ किलोपर्यंत मोफत.
विहित मोफत मर्यादेपेक्षा काही प्रमाणात जास्त वजन नेण्याची मुभा रेल्वे प्रवाशांना देते, ज्याला 'मार्जिनल अलाउन्स' म्हटले जाते यासाठी त्वरित दंड आकारला जात नाही:
फर्स्ट एसी: १५ किलो अतिरिक्त (एकूण ८५ किलोपर्यंत)
सेकंड एसी: १० किलो अतिरिक्त (एकूण ६० किलोपर्यंत)
थर्ड एसी आणि स्लीपर कोच: १० किलो अतिरिक्त (एकूण ५० किलोपर्यंत)
जर तुमचे सामान या 'मार्जिनल अलाउन्स' मर्यादेपेक्षाही जास्त असेल आणि प्रवासापूर्वी तुम्ही ते सामान वाहून नेणाऱ्या डब्यात बुक केले नसेल, तर तिकीट तपासणीदरम्यान आढळल्यास लागू असलेल्या पार्सल दराच्या सहापट दंड आकारला जाईल.
प्रवाशांच्या सोयीसाठी, 'सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स'ने तिकीट बुकिंग सॉफ्टवेअरमध्ये 'जास्त सामान' निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. जर प्रवाशाला विहित मर्यादेपेक्षा जास्त सामान न्यायचे असेल, तर ते तिकीट बुक करतानाच अतिरिक्त सामानाची आगाऊ नोंदणी करू शकतात आणि अशा प्रकारे दंड टाळू शकतात.