श्रीनगर : सुरेखा चोपडे
कन्याकुमारी ते थेट जम्मू-काश्मीर आव्हान स्वीकारून भारतीय रेल्वेने उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक प्रकल्प पूर्ण केला असून या प्रकल्पाचा शेवटचा टप्पा कटरा-बनिहाल (111 कि.मी.) येत्या 26 जानेवारीपासून प्रवासी सेवेत दाखल होईल आणि जम्मू-काश्मीर भारताशी रेल्वेनेही जोडले जाईल. यानिमित्ताने स्वातंत्र्यानंतर प्रथमच श्रीनगर उर्वरित भारताशी उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक प्रकल्पाद्वारे जोडला जाणार आहे. याच मार्गावर जगातील सर्वात उंच पूल अशी ओळख असलेला चिनाब पूल आणि देशातील भारतीय रेल्वेचा पहिला केबल पूल असलेल्या अजनी पुलावरून पहिली वंदे भारत स्लीपर गाडी धावणार आहे.
या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून यंदाचा प्रजासत्ताक दिन यानिमित्ताने भारतीय अभियांत्रिकीच्या इतिहासातील सुवर्ण क्षण ठरणार आहे. देशाच्या कानाकोपर्यात रेल्वे धावते. मात्र, काश्मीर खोर्यात रेल्वे आतापर्यंत पोहोचली नव्हती. त्यासाठीच भारतीय रेल्वेने उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक तयार करण्याचा निर्णय 1999 मध्ये घेतला. 2002 मध्ये हा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला. जम्मू - उधमपूर 55 कि.मी.चा पहिला टप्पा एप्रिल 2005 मध्ये सुरू करण्यात आला. तरीही भारत काश्मीरशी जोडला गेला नव्हता. तीन टप्प्यात काझींगड-बारामुल्ला मार्ग 2009 मध्ये सुरू करण्यात आला. 2013 मध्ये बनिहाल-काझींगड हा 18 कि.मी.चा मार्ग तर 2014 मध्ये उधमपूर-कटरा 25 कि.मी.चा मार्ग प्रवासी सेवेत खुला झाला. आता सर्वात खडतर असणारा शेवटचा टप्पा कटरा-बनिहाल (111 कि.मी.) पूर्ण झाला आहे.
पीरपंजाल डोंगररांगांच्या पोटातून चिरत जाणारा हा टप्पा जम्मूला काश्मीर खोर्याशी जोडतो. 2002 मध्ये या पुलाचे काम सुरू झाले. मात्र या प्रकल्पाच्या सुरक्षेबाबत अनेक शंका-कुशंका घेतल्या जाऊ लागल्यानंतर 2008 मध्ये काम मध्येच थांबविण्यात आले. अत्यंत दुर्गम प्रदेश, भूकंपप्रवण क्षेत्र, अतिवेगवान वारे आदी मुद्दे होते. अभ्यास झाल्यानंतर 2010 पुन्हा काम सुरू करण्यात आले आणि आता ते पूर्णत्वाला पोहोचले आहे.
बारामुल्ला ते काझीगुंड (118 किमी). कार्यान्वित वर्ष : 2009. हा विभाग पूर्ण होऊन प्रवासी रेल्वेसाठी सुरू आहे.
काझीगुंड ते बनिहाल (19 किमी). कार्यान्वित वर्ष : 2013. या विभागात पिर पंजाल बोगदा (11.2 किमी) असून प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
उधमपूर ते कटरा (25 किमी). कार्यान्वित वर्ष : 2014. या विभागामुळे वैष्णोदेवी मंदिराकडे जाणार्या भाविकांना सोयीस्कर रेल्वे सेवा उपलब्ध झाली आहे.
कटरा ते बनिहाल (111 किमी). हा विभाग अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थितीतून जातो. जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पूल (359 मीटर) याच विभागात आहे. स्थिती : 2024 मध्ये पूर्ण झाला आणि अंतिम टप्पा जानेवारी 2025 कार्यान्वित होणार.