भारतीय प्रवाशांसाठी एक मोठी आणि आनंददायक बातमी समोर आली आहे. आता भारतीय पासपोर्टधारक जगातील तब्बल 59 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकणार आहेत. हेन्ली पासपोर्ट इंडेक्सच्या ताज्या क्रमवारीत भारताच्या (77) स्थानात झालेल्या सुधारणेमुळे हे शक्य झाले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासाची योजना आखणार्या लाखो भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ज्या 59 देशांमध्ये भारतीयांना व्हिसाशिवाय किंवा‘व्हिसा-ऑन-अरायव्हल’ सुविधेसह प्रवेश मिळणार आहे, त्यात आशिया, आफ्रिका, युरोप आणि कॅरिबियन बेटांवरील अनेक लोकप्रिय पर्यटन स्थळांचा समावेश आहे.
आशिया : भूतान, इंडोनेशिया, मालदीव, नेपाळ, थायलंड, श्रीलंका, मकाओ, कतार.
आफ्रिका : मॉरिशस, सेशेल्स, झिम्बाब्वे, केनिया, टांझानिया, युगांडा, मादागास्कर.
युरोप : सर्बिया.
ओशनिया : फिजी, कुक आयलंडस्, सामोआ, तुवालु.
कॅरिबियन बेटे : बार्बाडोस, जमैका, त्रिनिदाद आणि टोबॅगो, ग्रेनाडा, हैती.
अमेरिका : बोलिव्हिया, एल साल्वाडोर.
हेन्ली पासपोर्ट इंडेक्स हा जगातील विविध देशांच्या पासपोर्टच्या ताकदीचे मूल्यांकन करतो. भारताच्या मानांकनात झालेली सुधारणा ही देशाची वाढती जागतिक पत आणि मजबूत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय संबंधांचे प्रतीक मानले जात आहे. भारताने अनेक देशांसोबत द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर आणि प्रवासाचे नियम सुलभ करण्यावर भर दिला आहे. याचाच परिणाम म्हणून आज अधिक देश भारतीयांचे स्वागत करण्यास उत्सुक आहेत.
वेळेची बचत : व्हिसा अर्जासाठी आणि मुलाखतीसाठी लागणारा वेळ वाचेल.
खर्चात कपात : व्हिसासाठी लागणारी मोठी फी भरावी लागणार नाही.
सहज नियोजन : आता अचानक ठरलेल्या प्रवासाचे नियोजन करणे सोपे होईल.
पर्यटनाला चालना : या सुविधेमुळे पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळेल.