Indian nurses demand in abroad
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसंस्था
युरोप आणि आखाती देशांमध्ये परिचारिकांचा तुटवडा असल्याने भारतीय परिचारिकांना मागणी वाढली आहे. दरमहा २ लाख ६० हजार ते ३ लाख २० हजार रुपये वेतनाची संधी उपलब्ध झाली आहे.
जर्मनी, आयर्लंड, माल्टा, संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि बेल्जियम येथे आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. त्यामुळे भारतातील परिचारिकांना आकर्षक वेतन देऊन रुजू करून घेतले जात आहे.
बॉर्डरप्लस या मनुष्यबळ विकास संस्थेने दिलेल्या माहितीनुसार जर्मनीत भारतीय परिचारिकांना दरमहा २,७०० युरो (सुमारे २.६ लाख रुपये) दिले जात आहेत. परवान्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर दरमहा वेतनात ३,३०० युरोपर्यंत (३.२ लाख रुपये) वाढ केली जात आहे. त्याउलट भारतातील खासगी रुग्णालयात परिचारिकांना दरमहा वेतन २० ते ४० हजार रुपये आहे. जर्मनीने २०३० पर्यंत पाच लाख परिचारिकांची पदे भरण्याचे नियोजन केले आहे.
अतिदक्षता विभाग, वृद्धत्वाशी निगडीत उपचार, प्रसूतीपूर्व सेवा अशा कामासाठी परिचारिकांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. काही देशांनी परिचारिकांच्या नियमात शिथिलता दिली आहे.
भाषेवर प्रभुत्व आणि परिचारिका परवाना परीक्षेतूनही सूट दिली जात आहे. ब्रॉडरप्लसने आंतरराष्ट्रीय पातळीवर नर्सिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी १० कोटी रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. विदेशातील परीक्षेची तयारी, आवश्यक कागदपत्रे आणि इतर बाबींसाठी मार्गदर्शन केले जाते. कोची येथे त्यासाठी प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. याशिवाय संबंधित देशातील भाषा शिकण्याची सुविधाही दिली जाते.
भारतात एक हजार लोकसंख्येमागे १.९६ परिचारिका काम करतात. विशेषतः ग्रामीण भाग आणि अविकसित ठिकाणी परिचारिकांचे प्रमाण कमी आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसीनुसार हे प्रमाण तीन हवे. इंडियन नर्सिंग कौन्सिल, असोसिएशन ऑफ हेल्थकेअर प्रोव्हायडर्सचे महासंचालक डॉ. गिरधर गयानी म्हणाले, देशात नर्सिंग क्षेत्रात काम करणाऱ्या ३३ लाख व्यक्तींची नोंद आहे. देशाच्या १.३ अब्ज लोकसंख्येसाठी हे प्रमाण अल्प आहे.
जर्मनीत सुरुवातीचे दरमहा वेतन २ लाख ६० हजार असेल. त्यात ३ लाख २० हजारांपर्यंत वाढ होईल. आयर्लंड येथे १.७ ते अडीच लाख, संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) दरमहा ७५ हजार ते दीड लाख वेतन मिळेल. मिळालेले उत्पन्न करमुक्त असेल. इतर, सवलतींचा लाभही दिला जातो. दुबईत ८० हजार ते २.४ लाखापर्यंत वेतन दिले जात आहे.