Indian Navy Helps Pakistani Fisherman:  pudhari
राष्ट्रीय

भारतीय नौदलामुळे वाचला पाकिस्तानी मच्छिमाराचा जीव; समुद्रातच केली शस्त्रक्रिया

Indian Navy Helps Pakistani Fisherman: भारताची युद्धनौका 'INS त्रिकंद'ने मार्ग बदलून घेतली धाव

Akshay Nirmale

पुढारी ऑनलाईन डेस्क: अरबी समुद्रातील मध्य भागात तैनात असलेल्या भारतीय युद्धनौकेमुळे एका पाकिस्तानी मच्छिमाराचा जीव वाचल्याची घटना समोर आली आहे.

एरवी दहशतवाद्यांना हाताशी धरून भारताला सतत अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय नौदलाने या कृतीतून जणू आरसाच दाखवला आहे. विशेष म्हणजे, या मच्छिमारावर भर समुद्रातच बोटीतच शस्त्रक्रियादेखील करण्यात आल्याचे समोर आले आहे.

ओमान या देशाच्या किनाऱ्याजवळ ही घटना घडली आहे. मच्छीमार जहाजावर असलेल्या पाकिस्तानी चालक दलाच्या जखमी सदस्याला भारतीय नौदलातील जवानांनी तातडीने महत्वाची वैद्यकीय मदत पुरवली. भारतीय नौदलाने रविवारी 6 एप्रिल 2025 रोजी ही माहिती दिली आहे.

INS त्रिकंद मदतीसाठी धावली

भारतीय नौदलाच्या मिशनवर तैनात असलेल्या स्टील्थ फ्रिगेट 'INS त्रिकंद' ही युद्धनौका ओमानच्या किनाऱ्यापासून समुद्रात सुमारे 350 नॉटिकल मैल अंतरावर होती. तेव्हा या युद्धनौकेवर अल ओमिदी या इराणी नौकेकडून एक संदेश प्राप्त झाला.

संकटात असल्याचा हा संदेश होता. त्यानंतर 'INS त्रिकंद' ने तातडीने हालचाली करत मदत केली. त्यामुळे पाकिस्तानी मच्छिमार जीवावरच्या संकटातून बाहेर पडण्यास मदत झाली.

नौदलाने दिली माहिती...

नौदलाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पाकिस्तानातील बलुचिस्तान भागातील या जखमी मच्छीमाराला नौदलाने मदत केली. तपासणी केल्यावर लक्षात आले की नौकेवरील चालक दलाच्या एका सदस्याला इंजिनवर काम करताना बोटाला गंभीर दुखापत झाली होती.

त्यानंतर त्याची परिस्थिती गंभीर बनली. त्याला इराणकडे चाललेल्या एफव्ही अब्दुल रहमान हंजिया या नौकेमध्ये हलविण्यात आले.

या नौकेत यावेळी 11 पाकिस्तानी आणि इराणचे 5 कर्मचारी उपस्थित होते. 11 पाकिस्तानींपैकी 9 जण बलुचिस्तानचे होते तर 2 जण पाकच्या सिंध प्रांतातले होते. त्यातील बलुचिस्तानच्या सदस्याला हाडांची गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या हातावर गंभीर जखम झाल्याने मोठा रक्तस्त्रावही झाली होता. या व्यक्तीला तातडीने वैद्यकीय मदत पुरविण्यासाठी 'INS त्रिकंद' ने लगेचच आपला मार्ग बदलला.

दरम्यान, INS त्रिकंदवरील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक आणि मार्कोस (मरीन कमांडो) आणि जहाजाच्या 'बोर्डिंग टीम'ने जखमीला वैद्यकीय मदत पुरवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT