राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात केली.  ANI X Photo
राष्ट्रीय

जागतिक आव्हानात सरकारने अर्थव्यवस्थेला धोरणात्मक निष्क्रीयतेतून बाहेर काढले: राष्ट्रपती

Budget Session | Droupadi Murmu | अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने शुक्रवारी, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. मध्यमवर्गासह दलित, वंचित आणि आदिवासींच्या विकासाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी बोलून केंद्र सरकारचे धोरण स्पष्ट केले. त्यांनी सरकारच्या पारदर्शक कार्यशैलीचे कौतुक केले. कोविड-१९ महामारी आणि युद्धाशी संबंधित अनिश्चितता यासारखे जागतिक आव्हाने असूनही, सरकारने अर्थव्यवस्थेला धोरणात्मक निष्क्रीयतेच्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी दृढनिश्चयाने काम केले आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. (Budget Session 2024)

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला संसदेच्या दोन्ही सभागृहांना संयुक्त संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, केंद्र सरकार मागील प्रशासनांपेक्षा तिप्पट वेगाने काम करत आहे. यावेळी त्यांनी वक्फ बोर्ड आणि एक देश, एक निवडणूक यासारख्या मुद्द्यांवर घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख केला. सरकारने तरुणांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले आहे. त्यांच्यासाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. यावेळी राष्ट्रपतींनी महाकुंभात चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही श्रद्धांजली वाहिली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिभाषणात सरकारच्या योजनांचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या की, सरकार कृषी उत्पादनांना योग्य भाव देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी काम करत आहे. सरकारने ३ कोटी अतिरिक्त कुटुंबांना नवीन घरे देण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेचा विस्तार केला आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत, ६ कोटी नागरिकांना आरोग्य विमा देण्याचा निर्णय घेतला. सरकारचे तरुणांच्या शिक्षणाकडे आणि नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्याकडे विशेष लक्ष आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती बदलली आहे. याशिवाय, सरकारने ईशान्येकडील लोकांमध्ये असलेली परकेपणाची भावना संपवण्याचा प्रयत्न केला आहे, असे त्या म्हणाल्या.

भारताच्या यूपीआय तंत्रज्ञानाचा विकसित देशांवरही प्रभाव

राष्ट्रपती म्हणाल्या की, डिजिटल फसवणूक, सायबर गुन्हे आणि डीपफेक हे सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेसमोरील आव्हाने आहेत. भारताच्या यूपीआय तंत्रज्ञानाने अनेक विकसित देशांवरही प्रभाव पाडला आहे. गेल्या दशकात, भारताने जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये अनेक टप्पे गाठले आहेत. या आधुनिक पायाभूत सुविधांमुळे जगात भारताची प्रतिमा मजबूत झाली आहे, गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास वाढला आहे. उद्योगांना बळकटी मिळाली आहे आणि नवीन नोकऱ्या निर्माण होत आहेत.

शहरी वाहतूक सुरळीत करण्याचे सरकारचे प्रयत्न

राष्ट्रपती म्हणाल्या की, शहरी वाहतूक सुरळीत करण्यासाठी सरकार सतत काम करत आहे. दिल्ली, पुणे, ठाणे आणि बेंगळुरूमधील मेट्रो प्रकल्प आणि अहमदाबाद-भुज मार्गावर सुरू केलेली नमो भारत रॅपिड रेल सेवा ही विकसित भारतीय शहरांची वैशिष्ट्ये आहेत.

मध्यमवर्गीयांसाठीच्या कामांचा उल्लेख

राष्ट्रपती म्हणाल्या की, मध्यमवर्गीय जितके मोठे स्वप्न पाहतील तितका देश उंचीवर जाईल. सरकारी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारने आठवा वेतन आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकृत पेन्शन योजनेअंतर्गत लाखो केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के खात्रीशीर पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्याचे सर्वत्र स्वागत झाले आहे, असे त्या म्हणाल्या.

घोडागाडीतून राष्ट्रपतींचे आगमन

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहा घोड्यांच्या गाडीतून आल्या. संसदेच्या परिसरात त्यांचे स्वागत उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले. राष्ट्रपतींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT