नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अमेरिकेने लादलेल्या 50 टक्के जबर आयात शुल्कामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी, भारतीय हिरे आणि ज्वेलरी निर्यातदार आता अमेरिकन बाजारपेठेतील आपली स्पर्धात्मकता टिकवण्यासाठी मित्र देशांमध्ये उत्पादन युनिटस् स्थापन करण्याचा गांभीर्याने विचार करत आहेत, असे उद्योगातील तज्ज्ञांनी म्हटले आहे.
या योजनेअंतर्गत भारतात दागिने आणि हिर्यांवर अर्धवट प्रक्रिया करून ते अंतिम निर्मितीसाठी दुसर्या देशात पाठवले जातील. तिथून पुढे ते अमेरिकेत निर्यात केले जातील. यामुळे उत्पादनाचे मूळ देश बदलेल आणि 27 ऑगस्ट 2025 पासून लागू झालेल्या या प्रचंड शुल्कापासून बचाव करणे शक्य होईल. मात्र उद्योगात यावर जोरदार चर्चा सुरू असली तरी अद्याप कोणत्याही मोठ्या कंपनीने अशा प्रकारच्या योजनेची अधिकृत घोषणा केलेली नाही. दिल्लीत आयोजित 13 व्या ‘दिल्ली ज्वेलरी अँड जेम फेअर 2025’ दरम्यान या विषयावर चर्चा झाली.
अमेरिकेच्या या शुल्कामुळे भारताच्या निर्यात क्षेत्राला विशेषतः लहान आणि मध्यम उद्योगांना मोठा धोका निर्माण झाला आहे. वस्त्रोद्योग, हिरे आणि रसायने यांसारख्या क्षेत्रांतील लहान आणि मध्यम उद्योगांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे, जे भारताच्या एकूण निर्यातीत सुमारे 45 टक्के वाटा उचलतात.