नवी दिल्ली : जागतिक संगीत क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणार्या 68 व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कारांसाठी भारतीय आणि भारतीय वंशाच्या कलाकारांना नामांकने मिळाल्याने देशाचे नाव पुन्हा एकदा उज्ज्वल झाले आहे. जगप्रसिद्ध सतारवादक आणि संगीतकार अनुष्का शंकर हिने तिच्या नवीनतम कार्यासाठी एकापेक्षा जास्त नामांकने मिळवत आघाडी घेतली आहे.
अनुष्का शंकरच्या ‘चॅप्टर तीन : वी रिटर्न टू लाईट’ या ईपीला बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम श्रेणीत नामांकन मिळाले आहे. या प्रकल्पात तिने सरोदवादक आलम खान आणि तालवादक सारथी कोरवर यांच्यासोबत काम केले आहे. यासोबतच संगीतकार सिद्धांत भाटिया यांचा कुंभमेळ्यावर आधारित ‘साऊंड्स् ऑफ कुंभ’ आणि शक्ती या दिग्गज बँडच्या ‘माईंड एक्स्प्लोजन’ (50 वी अॅनिव्हर्सरी टूर लाईव्ह) या अल्बमलाही याच श्रेणीत नामांकन मिळाले आहे.
अनुष्का शंकर आणि शक्ती या दोघांनाही बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स श्रेणीत दुसरे नामांकन मिळाले आहे. अनुष्काचा ट्रॅक ‘डेब्रेक’ आणि शक्तीचा ‘श्रीनीज ड्रीम’ (लाईव्ह) हे एकमेकांविरुद्ध स्पर्धेत आहेत. दुसरीकडे इंडो-अमेरिकन पियानोवादक चारू सुरी यांना त्यांच्या ‘शायन’ या अल्बमसाठी बेस्ट कन्टेंपररी इन्स्ट्रुमेंटल अल्बम श्रेणीत नामांकन मिळाले आहे, ज्यात जॅझ आणि भारतीय संगीताचा सुरेख संगम आहे.
* सतारवादक अनुष्का शंकर हिला तिच्या ‘चॅप्टर तीन : वी रिटर्न टू लाईट’साठी सर्वाधिक नामांकने मिळाली.
* बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बमसाठी अनुष्का, सिद्धांत भाटिया आणि शक्ती यांच्या कामांमध्ये चुरशीची लढत आहे.
* शक्ती बँडने त्यांच्या 50 व्या वर्धापनदिनाच्या लाईव्ह अल्बमसाठी नामांकन मिळवले.
* चारू सुरी यांना जॅझ आणि भारतीय प्रभावांनी युक्त अल्बमसाठी नामांकन मिळाले आहे.