Indian Army Rank Structure Reform Pudhari
राष्ट्रीय

Indian Army Rank: भारतीय सैन्यात मोठा बदल होणार? ब्रिगेडियर पद रद्द करण्याचा प्रस्ताव; कर्नल थेट मेजर जनरल होणार

Indian Army Rank Structure Reform: भारतीय सैन्यातील ब्रिगेडियर हे पद रद्द करून कर्नल पदावरून थेट मेजर जनरल पदावर बढती देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

Rahul Shelke

Indian Army Rank Structure Reform: भारतीय सैन्याच्या रँक व्यवस्थेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. सैन्यातील ब्रिगेडियर हे पदच रद्द करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास कर्नल पदावरून थेट मेजर जनरल पदावर बढती मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. यामुळे सैन्यातील अधिकाऱ्यांच्या बढतीची प्रक्रिया बदलणार असून त्यांच्या करिअरला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

सध्या भारतीय सैन्यातील पदांची रचना पिरॅमिडसारखी आहे. कनिष्ठ पदांवर अधिकाऱ्यांची संख्या मोठी आहे, तर वरिष्ठ पदांवर जागा मर्यादित आहेत. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांना बढतीसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. याच समस्येवर उपाय म्हणून सैन्याच्या रँक व्यवस्थेत बदल करण्याचा विचार सुरू आहे.

बढतीसाठी ३२ ते ३३ वर्षांची प्रतीक्षा!

सध्या भारतीय सैन्यातील अधिकाऱ्यांना मेजर जनरलच्या वेतनश्रेणीपर्यंत पोहोचण्यासाठी सरासरी ३२ ते ३३ वर्षे लागतात. दुसरीकडे, आयएएस, आयपीएस आणि भारतीय वन सेवेतील अधिकारी समान वेतनश्रेणीपर्यंत साधारण १६ ते १८ वर्षांत पोहोचतात. त्यामुळे सैन्य आणि नागरी सेवांमधील बढतीच्या कालावधीत मोठी तफावत दिसून येते.

ही तफावत कमी करण्यासाठी सैन्याच्या रँक व्यवस्थेत बदल करण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे. यामुळे अधिकाऱ्यांना योग्य वेळी बढती मिळण्यास मदत होईल. तसेच सैन्यातील अधिकाऱ्यांचे मनोबल वाढवणे आणि अनुभवी अधिकारी सैन्यात टिकवून ठेवणे हा देखील या प्रस्तावामागील उद्देश आहे.

यापूर्वी २०१८ मध्ये तत्कालीन लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांच्या कार्यकाळातही ब्रिगेडियर पद रद्द करण्याच्या शक्यतेवर चर्चा झाली होती. मात्र, त्यावेळी हा बदल प्रत्यक्षात लागू झाला नव्हता. आता या प्रस्तावाला पुन्हा गती मिळाली आहे. भारतीय सैन्य हा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयामार्फत आठव्या केंद्रीय वेतन आयोगाकडे पाठवण्याच्या तयारीत आहे. या महिन्यात किंवा पुढील महिन्यात यासंबंधीच्या शिफारशी पाठवल्या जाण्याची शक्यता आहे.

कमांड व्यवस्थेत नेमका काय बदल होणार?

सध्या ब्रिगेडियर दर्जाचे अधिकारी ब्रिगेडचे नेतृत्व करतात. मात्र, नवीन प्रस्तावानुसार ब्रिगेडची जबाबदारी मेजर जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे दिली जाऊ शकते. हे अधिकारी ब्रिगेडसोबतच डिव्हिजन स्तरावरील जबाबदाऱ्याही सांभाळतील. या बदलामुळे अधिकाऱ्यांच्या संपूर्ण सेवाकाळात पदोन्नतीच्या संधी वाढण्याची शक्यता आहे.

या बदलाचा परिणाम केवळ भारतीय सैन्यापुरता मर्यादित राहणार नाही. भारतीय नौदल आणि हवाई दलावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. कारण नौदलातील कमोडोर आणि हवाई दलातील एअर कमोडोर ही पदे ब्रिगेडियरच्या समकक्ष आहेत. त्यामुळे तिन्ही संरक्षण दलांमध्ये पदांची रचना आणि जबाबदाऱ्यांबाबत समन्वय साधावा लागणार आहे.

आधीच सैन्यात संघटनात्मक बदलांना सुरुवात

भारतीय सैन्य सध्या आपल्या कामकाजाच्या पद्धतीतही महत्त्वाचे बदल करत आहे. याचाच एक भाग म्हणून पाच एकात्मिक युद्ध गट (Integrated Battle Groups - IBG) आणि एक फायर सपोर्ट ग्रुप तयार केला आहे.

प्रत्येक एकात्मिक युद्ध गटामध्ये सुमारे ५ हजार सैनिक असतात. हा गट आकाराने ब्रिगेडपेक्षा मोठा आणि डिव्हिजनपेक्षा लहान असतो. या गटांचे नेतृत्व मेजर जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे असते. त्यामुळे ब्रिगेडियर पद रद्द करून मेजर जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे अधिक जबाबदाऱ्या देण्याचा प्रस्ताव सुसंगत ठरू शकतो.

प्रस्ताव लागू करताना कोणती आव्हाने असतील?

ब्रिगेडियर पद रद्द करण्याचा निर्णय घेतला तरी त्याची अंमलबजावणी करणे सोपे नसेल. सध्या या पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचे पुढे काय करायचे, त्यांच्या जबाबदाऱ्यांचे वाटप कसे करायचे आणि नौदल व हवाई दलाच्या पदांशी समन्वय कसा साधायचा, असे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात.

त्यामुळे या प्रस्तावाचा सर्व बाजूंनी विचार करावा लागणार आहे. संरक्षण मंत्रालय आणि आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या पातळीवर याबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे.

एकूणच, भारतीय सैन्याची पदरचना अधिक सोपी करणे, अधिकाऱ्यांना वेळेत बढती मिळवून देणे आणि सैन्याची कार्यक्षमता वाढवणे या उद्देशाने हा बदल महत्त्वाचा ठरू शकतो. मात्र, ब्रिगेडियर पद रद्द होणार की नाही, यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. सरकारची मंजुरी मिळाल्यानंतरच पुढची अंमलबजावणी होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT