Indian Army Chief Upendra Dwivedi Strategy: भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज (दि. १३ जानेवारी) मानेकशॉ सेंटरमध्ये वार्षिक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी आंतरराष्ट्रीय सीमा आणि प्रत्यक्ष ताबा रेषा येथील ८ दहशतवादी कॅम्प आहेत. जिथं दहशतवाद्यांना ट्रेनिंग देण्याचं काम केलं जातं. लष्कराची या ठिकाणांवर नजर असून जर आगळीक केली तर तिथं थेट कारवाई करण्यात येईल असं सांगितलं.
भारतीय लष्कर प्रमुखांची ही वार्षिक पत्रकार परिषद ही आर्मी डे (१५ जानेवारी) पूर्वी होत असते. त्यात ते देशाच्या सुरक्षेबाबत आणि सीमेवर होत असलेल्या हालचालींबाबत, लष्कराच्या आधुनिकीकरणाबाबत आणि भविष्यातील योजनांबाबत माहिती देत असतात.
लष्कर प्रमुख द्विवेदी यांनी उत्तरी सीमेवर म्हणजेच चीनला लागून असलेल्या सीमेवर स्थिती थोडी थोडी सामान्य होत आहे. उच्च स्तरावरील चर्चेचा फायदा होत असून तिथं स्थिती सध्या स्थीर आहे. मात्र आम्हाला सतर्क राहणं गरजेचं आहे. लष्कराची तैनाती ही संतुलित आणि सक्षमरित्या करण्यात आलेली आहे.
दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर २२ मिनिटात ऑपरेशन रीसेट रणनितीने कारवाई करण्यात आली होती. ऑपरेशन सिंदूर देखील सुरू आहे. पाकिस्ताननं भविष्यात कोणतीही चूक केली तर त्याला कडक प्रत्युत्तर देण्यात येईल असंही द्विवेदी यांनी सांगितले. जम्मू काश्मीरमध्ये स्थिती संवेदनशील आहे मात्र परिस्थिती नियंत्रणात आहे. भारत आणि चीन सीमेवर पाकिस्तानच्या अण्विक धमक्या बेअसर झाल्या आहेत.
मणिपूरमधील परिस्थिती आता हळूहळू स्थिर होत आहे. सुरक्षा दले आणि सरकार यांच्यातील योग्य समन्वयामुळे तिथे सुधारणा दिसून येत आहे. म्यानमारमधील निवडणुका पार पडल्यानंतर, भारत आणि म्यानमारची सेना सीमा सुरक्षेसाठी अधिक चांगल्या प्रकारे सहकार्य करू शकतील. एकंदरीत संपूर्ण ईशान्य भारतात शांतता प्रस्थापित होत आहे.
भारतीय लष्कराचा मुख्य फोकस आता 'आधुनिकीकरणावर' आहे. जनरल द्विवेदी यांनी माहिती दिली की, प्रगत ब्रह्मोस क्षेपणास्त्रे (Brahmos Missiles), अधिक क्षमतेचे ड्रोन आणि लॉयटरिंग म्युनिशन्स (हवेतून शत्रूचा शोध घेऊन हल्ला करणारी क्षेपणास्त्रे) लवकरच ताफ्यात सामील होणार आहेत. विशेष म्हणजे, लष्कराचे ९० टक्क्यांहून अधिक दारूगोळा आता पूर्णपणे 'स्वदेशी' बनावटीचा आहे.
लष्करातील महिलांच्या सहभागाबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. 'सीएमपी' (CMP) नंतर आता एईसी (Army Educational Corps) आणि मेडिकल (नॉन-टेक्निकल) विभागांमध्ये महिलांची सैनिक किंवा 'अग्निवीर' म्हणून भरती केली जाणार आहे.