India Pakistan water dispute Ranbir Canal on Chenab River Indus water treaty
नवी दिल्ली: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल वाटप करार निलंबित केला. त्यानंतर भारत-पाकिस्तान संघर्ष झाला, युद्धविरामही झाला. पण अद्यापही हा करार स्थगितच ठेवण्यावर भारत ठाम आहे.
या पुढे जाऊन भारताने आता आणखी आक्रमक जलनीतीचे धोरण स्वीकारले आहे. आता चिनाब नदीवरील रानबीर कालव्याची लांबी वाढवण्याची केंद्र सरकारची योजना आहे.
सद्य:स्थितीत भारत चिनाब नदीचे पाणी मुख्यतः सिंचनासाठी मर्यादित प्रमाणात वापरत आहे. मात्र, आता सिंधू जलवाटप करार निलंबित केल्यामुळे ऊर्जा निर्मिती क्षेत्रातही या पाण्याचा वापर वाढवण्याची शक्यता आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
"रानबीर कालव्याची लांबी 120 किमीपर्यंत वाढवण्याची मोठी योजना आहे, या संरचनेच्या उभारणीस वेळ लागणार असल्याने सर्व संबंधित यंत्रणांना प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही सांगण्यात आले.
याशिवाय कठुआ, रावी आणि परगवाल कालव्यांमध्ये गाळ काढण्याचे कामही सुरू झाले आहे, असे दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले.
भारताने सिंधू जल करार निलंबित केल्यामुळे पाकिस्तानच्या कृषी क्षेत्रावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे, जे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानले जाते.
चिनाब ही पश्चिमवाहिनी नदी असून ती सिंधु नदीची उपनदी आहे. चिनाब नदीचा उगम हिमाचल प्रदेशातील बारालाचा पास परिसरात झाला आहे.
चंद्रा आणि भागा या दोन नद्यांच्या संगमातून चेनाब नदीची निर्मिती होते. ही नदी जम्मू आणि काश्मीरमधून वाहत पाकिस्तानमध्ये प्रवेश करते.
पाकिस्तानमधून वाहताना चिनाब नदी झंग आणि मुजफ्फरगड या जिल्ह्यांतून जाते. शेवटी ही नदी पाकिस्तानातील पंजाब प्रांतात सिंधू नदीला मिळते.
सिंधू नदीत मिळण्याआधी चिनाबमध्ये झेलम आणि रावी नदीचे पाणी देखील येऊन मिळते. त्यामुळे चिनाब नदीचे सिंधू नदीतील योगदान जलप्रवाहाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
सिंधू नदीच्या उपनद्या या हिमालयातून उगम पावून पाकिस्तानमधून वाहत असलेल्या सिंधू नदी प्रणालीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत. या उपनद्यांना दोन मुख्य गटांमध्ये विभागले जाते.
पूर्ववाहिनी नद्या- या नद्या भारताच्या नियंत्रणात असून भारत त्या पूर्णतः वापरू शकतो, असे सिंधू जल करार 1960 मध्ये ठरवण्यात आले आहे. यात रावी, बियास, सतलज या नद्यांचा समावेश आहे.
पश्चिमवाहिनी नद्या- या नद्या मुख्यतः पाकिस्तानच्या उपयोगासाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत, पण भारत मर्यादित सिंचन, जलविद्युत निर्मिती व इतर न वापरणाऱ्या पद्धतीने वापर करू शकतो. यात झेलम, चिनाब आणि सिंधु या प्रमुख नदीचा समावेश आहे.
सिंधू नदी प्रणालीतील एकूण पाण्याच्या 80 टक्के भाग पाकिस्तानमध्ये जातो. त्यामुळे पाकिस्तानच्या कृषी व आर्थिक सुरक्षेसाठी ही नदी प्रणाली अत्यंत महत्वाची आहे.
1960 मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने केलेला सिंधू जल करार हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याच्या वाटपावर आधारित आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने हा करार निलंबित केला असून पाकिस्तानने "आंतरराष्ट्रीय दहशतवादाला कायमस्वरूपी आणि विश्वासार्हपणे नकार" दिल्याशिवाय करार पुन्हा लागू केला जाणार नाही, अशी भारताची भूमिका आहे.