India vs Pakistan
नवी दिल्ली : आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानच्या जबड्यातून विजय खेचून आणत आशिया चषक जेतेपदावर थाटामाटात शिक्कामोर्तब केले. आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष आणि पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नक्वी यांनी भारतीय खेळाडूंना ट्रॉफी आणि पदके स्वीकारण्यापासून रोखले. भारतीय संघाने यापूर्वीच घोषणा केली होती की, खेळाडू नक्वी यांच्या हातून ट्रॉफी घेणार नाहीत.
या निर्णयाचा आदर करण्याऐवजी नक्वी निर्लज्जपणे स्टेजवरच उभे राहिले आणि नंतर ट्रॉफी घेऊन हॉटेलकडे निघाले. नक्वी यांच्या निर्लज्जपणाचा कळस तेव्हा झाला, जेव्हा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनपर ट्विटवर पुन्हा खोटं बोलले. इतरांना खेळ आणि राजकारण एकत्र आणू नये असा सल्ला देणारे नक्वी स्वतःच या प्रकरणाला राजकीय वळण देताना दिसत आहेत.
भारताने नक्वी यांना पाकिस्तानचे प्रतिनिधी मानून त्यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. एसीसी अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि पुरस्कारांचे वितरण एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष खालिद अल जरूनी यांनी करावे, असा सल्ला दिला, परंतु नक्वी यांनी तसं होऊ दिलं नाही. जवळपास एक तास चाललेल्या तणावानंतर, आयोजकांनी चुपचाप ट्रॉफी काढून घेतली, तर वैयक्तिक कामगिरी करणारे खेळाडू जसे की तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांना सन्मानित करण्यात आले.
सामन्यादरम्यान स्टँड्समध्ये बसलेले प्रेक्षक आणि सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांनी आपला संताप व्यक्त केला. प्रेक्षकांनी तर 'भारत माता की जय' आणि 'मोदी-मोदी' च्या घोषणाही दिल्या. पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा स्टेजकडे जात असताना त्याला हुटिंगचा सामना करावा लागला. यामुळे नक्वी बिथरले आणि मैदानातून भारताच्या ट्रॉफीसह पळून गेले. दुसरीकडे, पाकिस्तानचा संघ सामना संपल्यानंतर बराच वेळ ड्रेसिंग रूममध्ये राहिला, ज्यामुळे नक्वी बराच काळ एकटे आणि अस्वस्थ परिस्थितीत दिसले.
भारताच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांनी ट्विट करत लिहिलं होतं, 'खेळाच्या मैदानातही ऑपरेशन सिंदूर. इथेही निकाल तोच- भारत जिंकला. क्रिकेटपटूंचे अभिनंदन.' याला उत्तर देताना नक्वी यांनी ट्विट करून एक धक्कादायक आणि खोटं विधान केलं. त्यांनी लिहिलं, 'जर अभिमानाचं माप युद्ध असेल, तर इतिहास आधीच पाकिस्तानकडून झालेल्या तुमच्या लाजिरवाण्या पराभवांची नोंद करून ठेवली आहे. कोणताही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही. युद्धाला खेळात ओढणं केवळ निराशा दर्शवतं आणि खेळाच्या आत्म्याचा अपमान आहे.'