नवी दिल्ली : ‘दहशतवाद्यांचा खात्मा करणे हा ऑपरेशन सिंदूरचा हेतू होता. दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवले. या कारवाईत भारताने दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. त्यांच्या 9 अड्ड्यांना उद्ध्वस्त करण्यात यश आले. कसाबने प्रशिक्षण घेतलेल्या मुरीदकेतील तळ उद्धवस्त करण्यात आला’, अशी माहिती DGMOचे लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिली. डीजीएमओ आणि तिन्ही सैन्य दलाच्या संयुक्त पत्रकार परिषदेतून भारताने पाकिस्तानवर केलेल्या कारवाईबाबतची माहिती रविवारी (दि. 11) संध्याकाळी देण्यात आली. यावेळी घई बोलत होते.
रविवारी भारतीय लष्कराने पाकिस्तानविरुद्ध सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची सविस्तर माहिती दिली. अलिकडेच नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने केलेल्या जोरदार गोळीबारात शस्त्रू देशाचे 40 सैनिक ठार झाले, तर पाच भारतीय सैनिकही शहीद झाले, असे लष्कराने म्हटले आहे. ऑपरेशन सिंदूरमधील सर्व भारतीय वैमानिक सुरक्षित असल्याचे लष्कराने स्पष्ट केले. पाकिस्तानला इशारा देताना लष्कराने म्हटले आहे की जर पाकिस्तानने अजूनही शस्त्रसंधीचे उल्लंघन केले तर त्यांना योग्य प्रत्युत्तर दिले जाईल.
‘ऑपरेशन सिंदूर’ हे दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी होते. या काळात आम्ही 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारताने पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तान आणि पीओकेमधील एकूण 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले. यातील बहावलपूर आणि मुरीदके हे तळ आमच्या निशाण्यावर होते. आम्ही बहावलपूरमधील जैशचा दहशतवादी तळ उद्धवस्त केला. कसाबने प्रशिक्षण घेतलेल्या मुरीदकेतील तळही उद्धस्त केला. या कारवाईत एकूण 100 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. लाहोरमधील डिफेन्स सिस्टम उद्धवस्त करण्यात आली. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने सर्व पाकिस्तानी ड्रोन पाडले, अशी माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली.
लष्कराने सांगितले की, भारताकडून देण्यात येणाऱ्या प्रत्युत्तर हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी पाकिस्तानने नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर केला, परंतु आम्ही कोणत्याही नागरी विमानाला लक्ष्य केले नाही. आम्ही पाकिस्तानमधील लष्करी तळांचे नुकसान केले.
‘ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, बहावलपूर आणि मुरीदके येथील दहशतवाद्यांच्या महत्त्वाच्या अड्ड्यांवरही हल्ला करण्यात आला, ज्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. पाकिस्तानने लहान ड्रोन आणि यूएव्हीद्वारे भारताच्या लष्करी तळांना आणि हवाई पट्ट्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने प्रत्येक हल्ला हाणून पाडला, असेही लष्कराने स्पष्ट केले.
भारतीय लष्कराने म्हटले आहे की, सुरुवातीला पाकिस्तानी लष्कराचे सैनिक आमचे लक्ष्य नव्हते आणि आमचे उद्दिष्ट फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करणे होते. जेव्हा पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केले आणि गोळीबार केला तेव्हा आम्हीही जोरदार प्रत्युत्तर दिले. ज्यामध्ये पाकिस्तानी सैन्याचेही मोठे नुकसान झाले. आमचे काम टार्गेटला हिट करणे आहे, जे आम्ही खूप चांगल्या पद्धतीने केले. मृतदेह मोजणे हे आपचे काम नाही.