राष्ट्रीय

India vs Australia : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज तिसरा वन-डे सामना

दिनेश चोरगे

राजकोट; वृत्तसंस्था :  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज बुधवारी (27 सप्टेंबर) राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. या मालिकेत टीम इंडियाने पहिले दोन सामने जिंकले असून, मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. मात्र, मीडिया रिपोर्टस्नुसार, अष्टपैलू हार्दिक पंड्या व्यतिरिक्त सलामीवीर शुभमन गिल, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर आणि अक्षर पटेल हे टीम इंडियाच्या प्लेईंग-11 चा भाग असणार नाहीत.

मालिकेच्या शेवटच्या सामन्यासाठी अक्षर पटेल, शुभमन गिल आणि शार्दूल ठाकूर हे तीन खेळाडू संघाचा भाग नसतील, हे आधीच जाहीर करण्यात आले आहे. शार्दूल आणि गिल यांना विश्रांती देण्यात आली आहे, तर अक्षर पटेल दुखापतग्रस्त आहे. मात्र, आता मोहम्मद शमी आणि हार्दिक पंड्या तिसरा वन-डे सामना खेळणार नसल्याचे आता समोर येत आहे. हे दोन्ही खेळाडू संघासह राजकोटला पोहोचलेले नाहीत. शमीने पहिले दोन एकदिवसीय सामने खेळले होते, तर हार्दिक पंड्याने पहिले दोन सामने खेळलेले नाहीत. याचा अर्थ तो संपूर्ण मालिकेलाच मुकला आहे.

राजकोट येथे होणार्‍या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली पुनरागमन करणार आहेत. त्यामुळे फलंदाजी क्रमवारीत बदल होईल. गेल्या सामन्यात तिसर्‍या क्रमांकावर खेळणारा श्रेयस अय्यर चौथ्या, तर के. एल. राहुल पाचव्या क्रमांकावर मैदानात उतरेल. अशातच सूर्यकुमार यादवला पुन्हा संधी मिळणार हे जवळपास स्पष्ट दिसत आहे. तो सहाव्या क्रमांकावर येऊन फिनिशिंग टच देईल.

जडेजा-अश्विनची फिरकी जोडी पुन्हा एकत्र दिसणार

रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन ही जोडी पुन्हा मैदानात दिसेल. जडेजा आधीच विश्वचषक संघात आहे. मात्र, अक्षर पटेल पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यास अश्विनचा समावेश केला जाऊ शकतो, अशी शक्यता अश्विनबाबत वर्तवली जात आहे. 28 सप्टेंबरपर्यंत 'आयसीसी'च्या नियमांनुसार संघात बदल केले जाऊ शकतात. या सामन्यात कुलदीप यादव पुन्हा एकदा पुनरागमन करू शकतो, तर जसप्रीत बुमराहचा वेगही दिसून येईल. कारण, पहिल्या दोन सामन्यांमध्ये हे दोन्ही खेळाडू विश्रांती घेत होते. मोहम्मद सिराजही या सामन्यात खेळेल.

आज तिसरा वन-डे

स्थळ : एस.सी.ए. स्टेडियम, राजकोट.
वेळ : दुपारी 1.30 वाजल्यापासून
प्रक्षेपण : स्पोर्टस् 18 चॅनेल
लाईव्ह स्ट्रिमिंग : जिओ सिनेमा अ‍ॅप

SCROLL FOR NEXT