नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारत आणि अमेरिकेने व्यापारासंदर्भातील ‘बहुतेक प्रलंबित मतभेद दूर केले आहेत आणि मार्च 2026 पर्यंत एक औपचारिक करार अस्तित्वात येऊ शकतो,अशी माहिती मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी दिली.
नागेश्वरन म्हणाले की, आर्थिक वर्ष 27 साठी भारताच्या विकासाचा द़ृष्टिकोन मजबूत आहे आणि रुपया मूलभूत घटकांच्या तुलनेत अवमूल्यित आहे. अमेरिकेच्या अधिकार्यांनी नुकतेच संकेत दिले आहेत की, त्यांना भारताकडून आतापर्यंतचे सर्वात सकारात्मक व्यापारी प्रस्ताव मिळाले आहेत. ही घडामोड वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या वक्तव्यानंतर एका दिवसाने समोर आली आहे, ज्यात त्यांनी म्हटले होते की अमेरिकेसोबत प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा प्रगतीपथावर आहे आणि अमेरिकेचे एक शिष्टमंडळ वाटाघाटीसाठी नवी दिल्लीत आले आहे. ‘त्यांच्यासोबत चर्चा सातत्याने पुढे जात आहे. आम्ही द्विपक्षीय व्यापार कराराच्या दिशेने पुढे जात आहोत’, असे गोयल यांनी पत्रकारांना सांगितले.
भारत आणि वॉशिंग्टन कराराचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याने अमेरिकेच्या शिष्टमंडळाचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे भारताने सुरू ठेवल्यामुळे वॉशिंग्टनने भारतीय निर्यातीवर 25 टक्के शुल्क आणि अतिरिक्त 25 टक्के दंड आकारला होता. त्यानंतर अमेरिकन अधिकार्यांचा हा दुसरा भारत दौरा आहे. यापूर्वी त्यांनी 16 सप्टेंबर रोजी भारताला भेट दिली होती.
शिष्टमंडळामध्ये सकारात्मक चर्चा
अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर यांनी मंगळवारी वॉशिंग्टनमधील सिनेट विनियोजन उपसमितीच्या सुनावणीत माहिती दिली की, भारताने प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारावर आतापर्यंतचे सर्वात सकारात्मक प्रस्ताव सादर केले आहेत. अमेरिकेला भारताकडून आतापर्यंतचे सर्वोत्तम प्रस्ताव मिळाले आहेत, जरी मका, सोयाबीन, कापूस आणि गहू यांसारख्या अमेरिकन पिकांच्या आणि मांस उत्पादनांच्या बाजारपेठेतील प्रवेशावरून मतभेद कायम आहेत. ‘हे एक मोठे आव्हान होते... पण ते खूपच सकारात्मक राहिले आहेत’, असे त्यांनी सांगितले.