Donald Trump | भारत-अमेरिका व्यापार करार लवकरच होणार  
राष्ट्रीय

Donald Trump | भारत-अमेरिका व्यापार करार लवकरच होणार

; मार्को रुबिओ यांनीही स्पष्ट केली अमेरिकेची भूमिका

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारत आणि अमेरिका व्यापार कराराच्या खूप जवळ पोहोचले आहेत. हा करार आधीच्या करारांपेक्षा पूर्णपणे वेगळा असेल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्याचवेळी भारत दौऱ्यावर असणारे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनीही काही आठवड्यांतच हा करार पूर्णत्वास जाईल, असे स्पष्ट केले. अमेरिकेच्या दोन्ही सर्वोच्च नेत्यांनी हे संकेत दिल्याने कराराबाबत असणारी संदिग्धता संपुष्टात आली आहे.

मंगळवारी ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प म्हणाले की, भारत आणि अमेरिका व्यापार कराराच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. त्यांची करार करण्याची इच्छा आहे. आम्हीही करार करणार आहोत. अगदी जवळ आलो आहोत. दरम्यान, जामनगर येथे बोलताना मार्को रुबिओ यांनी अमेरिकेची भारताबाबतची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, एफ-१बी व्हिसा धोरणाबाबत अमेरिकेने भारताला लक्ष्य करण्यासाठी निर्णय घेतलेले नाहीत. पाकिस्तानशी संबंध भारताच्या मैत्रीची किंमत चुकवून प्रस्थापित होणार नाहीत. भारत-अमेरिका संबंध वॉशिंग्टनच्या परराष्ट्र धोरणाचा महत्त्वाचा कणा असून बहुप्रतीक्षित भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात असून काही आठवड्यांतच त्यावर स्वाक्षरी होईल. भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित व्यापार करारावर गेली दीड वर्षे चर्चा सुरू आहे. या कराराविषयी बोलताना रुबिओ म्हणाले, या कराराचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून आम्ही अवघ्या काही आठवड्यांच्या अंतरावर आहोत. दोन्ही बाजू करारातील तांत्रिक शब्दावली आणि व्याख्यांवर एकमत करत आहेत, जेणेकरून भविष्यात अडचण निर्माण होणार नाही.

शांततेसाठी भारताचा पुढाकार

पाकिस्तानशी अमेरिकेचे संबंध भारताच्या हिताला बाधा पोहोचवून कधीही प्रस्थापित होणार नाहीत, अशी ग्वाही रुबिओ यांनी दिली. चीनबाबत बोलताना त्यांनी जागतिक आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी समतोल भूमिका आवश्यक असल्याचे सांगितले. रशिया-युक्रेन संघर्षात युद्धबंदीसाठी भारताने मांडलेल्या प्रस्तावाचे त्यांनी कौतुक केले असून, भारताच्या राजनयिक प्रयत्नांचे अमेरिकेने स्वागत केले आहे.

व्हिसा नियम आणि स्थलांतर धोरण

अमेरिकेतील एच-१बी व्हिसावरील बंधने आणि स्थलांतर धोरणाबाबत भारतीय समुदायात असलेल्या चिंतेवर रुबिओ यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, गेल्या काही वर्षांत बेकायदेशीर स्थलांतरामुळे अमेरिकेची यंत्रणा कोलमडली होती. आम्ही केवळ कायदेशीर चौकटीत सुधारणा करत आहोत. हा निर्णय कोणत्याही एका देशाला किंवा भारताला लक्ष्य करून घेतलेला नाही. कायदेशीर मार्गाने शिक्षण, नोकरी आणि पर्यटनासाठी येणाऱ्यांचे अमेरिकेत नेहमीच स्वागत आहे.

रशियन तेल आणि शुल्क धोरणातील समतोल

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला रशियन तेल खरेदीवर निर्बंधांतून दिलेली तात्पुरती सूट हा नवी दिल्लीसाठी मोठा दिलासा ठरला आहे. यावर भाष्य करताना रुबिओ यांनी सांगितले की, अमेरिकेच्या आयात शुल्काचा (टॅरिफ) उद्देश भारताला त्रास देणे किंवा शिक्षा करणे हा कधीच नव्हता. ट्रम्प प्रशासनाला हे ठाऊक आहे की, अशा निर्बंधांचा भारत-अमेरिका संबंधांवर अत्यंत विपरीत परिणाम होऊ शकतो. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर दबाव निर्माण करतानाच भारतासारख्या महत्त्वाच्या भागीदाराशी संबंध बिघडू नयेत, असा समतोल अमेरिका साधत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ऊर्जा सहकार्य आणि जामनगर भेट

आपल्या दौऱ्यात गुजरातच्या जामनगर येथील रिलायन्स रिफायनरीला भेट देण्याबाबत रुबिओ यांनी ऊर्जा सुरक्षेवर भर दिला. व्हेनेझुएलाचे हेवी क्रूड ऑईल रिफाइन करण्याची क्षमता अमेरिका आणि भारतात प्रामुख्याने रिलायन्सकडे आहे. रिलायन्सने अमेरिकेतील टेक्सास रिफायनरीमध्येही मोठी गुंतवणूक केली आहे. ऊर्जा स्रोतांचे वैविध्य जपण्यासाठी आणि जागतिक पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी हे सहकार्य निर्णायक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT