नवी दिल्ली; वृत्तसंस्था : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विश्लेषणानुसार, या दशकाच्या अखेरीस भारत चीनप्रमाणेच उच्च मध्यम उत्पन्न असलेल्या देशांच्या गटात सामील होण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताचे दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न 4,000 डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा असून, यामुळे जागतिक बँकेच्या वर्गीकरणानुसार भारत चीन आणि इंडोनेशियासारख्या देशांच्या रांगेत जाऊन बसेल.
1962 मध्ये भारताचे दरडोई उत्पन्न 90 डॉलर्स होते, जे 2007 मध्ये 910 डॉलर्स झाले (निम्न मध्यम उत्पन्न गट). 2019 मध्ये हे उत्पन्न 2,000 डॉलर्सवर पोहोचले आणि 2030 पर्यंत ते 4,000 डॉलर्सवर पोहोचण्याचा अंदाज आहे.
भारत 2028 पर्यंत जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे.2047 पर्यंत उच्च उत्पन्न देश होण्यासाठी भारताला आपले दरडोई उत्पन्न सुमारे 13,936 डॉलर्सपर्यंत नेणे आवश्यक आहे.
यासाठी भारताला वार्षिक 7.5% विकास दर राखणे आवश्यक आहे. गेल्या 23 वर्षांत (2001-2024) भारताचा वार्षिक विकास दर 8.3% राहिला आहे, त्यामुळे हे ध्येय गाठणे शक्य असल्याचे ‘एसबीआय’ने म्हटले आहे.
1990 मध्ये चीनचे दरडोई उत्पन्न केवळ 330 डॉलर्स होते (कमी उत्पन्न गट), जे 2024 पर्यंत उच्च मध्यम गटात पोहोचले आहे. इंडोनेशियानेही अशीच प्रगती केली आहे.