पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनच्या डीपसीक एआय (DeepSeek-R1) मॉडेलने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. अमेरिकेचे ChatGPT ही आधीपासूनच चर्चेत आहे. याचदरम्यान केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जनरेटिव्ह एआयबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. भारत स्वतःचे जनरेटिव्ह एआय मॉडेल विकसित करण्याची तयारी करत असल्याचे वैष्णव यांनी म्हटले आहे. यामुळे भारताच्या नवीन येणाऱ्या AI मॉडेलसमोर ओपनएआयचे (OpenAI) चॅटजीपीटी (ChatGPT) आणि चीनचे स्टार्टअप डीपसीक सारख्या स्वस्त एआय मॉडेलचे आव्हान असेल.
याबाबतची घोषणा मंत्री वैष्णव यांनी उत्कर्ष ओडिशा कॉन्क्लेव्हमध्ये केली. "आम्हाला असा विश्वास आहे की किमान ६ प्रमुख डेव्हलपर्स आहेत जे बाह्य मर्यादेवर ६ ते ८ महिन्यांत एआय मॉडेल विकसित करू शकतात आणि यासाठी अधिक आशावादी अंदाजानुसार यासाठी चार ते सहा महिने लागू शकतात."
"एक मजबूत एआय इकोसिस्टम तयार करण्यासाठी एक सामान्य संगणकीय सुविधा हा सर्वात महत्वाचा घटक आहे," असे वैष्णव पुढे म्हणाले. त्यांनी यावेळी संशोधक, स्टार्टअप्स आणि शैक्षणिक संस्थांना एआय विकसित करण्यास चालना देण्यासाठी उच्च दर्जाच्या संगणकीय पायाभूत सुविधांची आवश्यकता असल्याच्या मुद्द्यावर भर दिला. India AI Mission चा एक भाग म्हणून केंद्र सरकारने सामायिक संगणकीय संसाधन स्थापनेस प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारत स्वतःचे असे एक मूलभूत एआय मॉडेलदेखील लाँच करत आहे. जे देशाच्या भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेशी अनुकूल असे डिझाइन केलेले आहे. वैष्णव यांनी पुढे सांगितले की एआय मॉडेल डेव्हलपमेंटसाठी आजपासून प्रस्ताव मागवले जातील. ज्यासाठी चार ते आठ महिन्यांचा कालावधी लागेल. ''किमान ६ प्रमुख डेव्हलपर्स ६ ते ८ महिन्यांत एआय मॉडेलची निर्मिती करू शकतात. काही डेव्हलपर्संकडून ४ ते ६ महिन्यांत प्रतिसाद मिळेल," असेही ते म्हणाले.
जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI वर नियंत्रण मिळवण्यासाठी आता चढाओढ सुरु झाली आहे. नुकतीच चीनच्या एका नवीन एआय मॉडेलच्या एंट्रीने जगभरात खळबळ उडवून दिली. चीनचे एआय स्टार्टअप डीपसीक-आर१ ने (DeepSeek-R1) एक स्वस्त एआय मॉडेल आणले आहे. काही वेळातच डीपसीक आर१ चॅटबॉट ॲपने (DeepSeek R1 chatbot) जगभरातील डाउनलोड चार्टमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली आहे. संशोधकांच्या म्हणणण्यानुसार, १० जानेवारी रोजी लाँच झालेले डीपसीक-व्ही३ मॉडेलमध्ये (DeepSeek-V3 model) प्रशिक्षणादरम्यान Nvidia च्या कमी क्षमतेच्या H800 चिप्सचा वापर करण्यात आला. त्यासाठी ६० लाख डॉलरपेक्षा कमी खर्च केला. गेल्या आठवड्यात रिलीज करण्यात आलेले डीपसीक-आर१ मॉडेल हे कामाच्या बाबतीत वापरण्यास OpenAI's o1च्या मॉडेलपेक्षा २० ते ५० पट स्वस्त आहे, असे डीपसीकच्या अधिकृत WeChat अकाउंटवरील पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.