India BRICS Trade | डॉलरऐवजी रुपयात व्यवहार शक्य Pudhari File Photo
राष्ट्रीय

India BRICS Trade | डॉलरऐवजी रुपयात व्यवहार शक्य

भारत ‘ट्रम्प टॅरिफ’ला प्रत्युत्तर देणार; ब्रिक्स देशांसोबत स्थानिक चलनात व्यापार

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 50 टक्के टॅरिफ लागू केल्यानंतर भारताने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ब्रिक्स देशांसोबत रुपयामध्ये व्यापार करण्यास परवानगी देऊन भारताने एक मोठे पाऊल उचलले आहे. यामुळे अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान मिळू शकते. या निर्णयानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांना पूर्वपरवानगीशिवाय अधिक व्होस्ट्रो खाती उघडण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यामुळे रुपयामधील व्यापाराला चालना मिळेल.

85 टक्के व्यापार अमेरिकन डॉलरमध्ये

भारत सरकारचे हे पाऊल रुपयाची आंतरराष्ट्रीय भूमिका मजबूत करण्यासाठी आणि डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. विशेषतः अशावेळी जेव्हा अमेरिकेने भारतीय निर्यातीवर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. सध्या भारतीय व्यापारी सुमारे 85 टक्के परकीय व्यापार अमेरिकन चलन डॉलरमध्ये करतात; परंतु 10 ते 15 टक्के व्यवहार रुपयामध्ये स्थलांतरित झाल्यास डॉलरवरील वार्षिक सुमारे 100 अब्ज डॉलर्सचे अवलंबित्व कमी होईल.

भारतीय व्यापार्‍यांसाठी व्होस्ट्रो खाती

व्यापारी तूट कमी करण्यासाठी भारत ब्रिक्स देशांसोबत स्वतःच्या चलनामध्ये व्यापार आणि व्यवहारांना प्रोत्साहन देत आहे. कारण, ब्रिक्स देशांसोबत व्यापार केल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात आपले स्थान मजबूत करण्याची आणि गुंतवणुकीला आकर्षित करण्याची संधी मिळते. त्यामुळे या देशांसोबत भारतीय चलनात व्यापाराला चालना देण्यासाठी भारत सरकारने अनेक पावले उचलली आहेत. उदाहरणार्थ, रुपयामधील व्यापारासाठी सरकारने भारतीय व्यापार्‍यांना विशेष व्होस्ट्रो खाती दिली आहेत.

भारत 40 देशांमध्ये निर्यात वाढविणार

नवी दिल्ली : अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर 50 टक्के शुल्क लावल्याच्या पार्श्वभूमीवर कापड निर्यातीला चालना देण्यासाठी भारताने ब्रिटन, जपान आणि दक्षिण कोरियासह 40 देशांमध्ये विशेष प्रचार कार्यक्रम (outreach programmes) राबवण्याची योजना आखली आहे. एका अधिकार्‍याने बुधवारी ही माहिती दिली.

या देशांमध्ये जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन, नेदरलँडस्, पोलंड, कॅनडा, मेक्सिको, रशिया, बेल्जियम, तुर्कस्तान, संयुक्त अरब अमिराती आणि ऑस्ट्रेलिया यांचाही समावेश आहे. या 40 बाजारपेठांपैकी प्रत्येकामध्ये एक लक्ष्यित द़ृष्टिकोन अवलंबण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये भारतीय उद्योग, निर्यात प्रोत्साहन परिषद आणि या देशांमधील भारतीय दूतावासांच्या नेतृत्वात भारताला गुणवत्ता, टिकाऊ आणि नावीन्यपूर्ण वस्त्र उत्पादनांचा एक विश्वासार्ह पुरवठादार म्हणून स्थापित केले जाईल, असे या अधिकार्‍याने सांगितले.

40 देशांमध्ये मोठी संधी

भारत आधीच 220 हून अधिक देशांना निर्यात करतो; परंतु या 40 आयातदार देशांमध्ये निर्यातीला चालना देण्याची खरी संधी आहे. एकत्रितपणे या 40 देशांमध्ये 590 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची वस्त्रे आणि तयार कपड्यांची आयात होते. यामुळे भारताला आपला बाजारातील वाटा वाढवण्यासाठी मोठी संधी आहे, जो सध्या केवळ 5-6 टक्के आहे, असे अधिकार्‍याने सांगितले. हे ओळखून सरकार या 40 देशांपैकी प्रत्येकामध्ये पारंपरिक आणि उदयोन्मुख बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करून विशेष प्रचार कार्यक्रम राबवण्याची योजना आखत आहे, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT