India space data center | अंतराळात साकारणार भारताचे डेटा सेंटर! File photo
राष्ट्रीय

India space data center | अंतराळात साकारणार भारताचे डेटा सेंटर!

पृथ्वीजवळच्या कक्षेत स्थापित करणार : प्रकल्पाची तयारी पूर्ण; दोन एआय कंपन्यांचा पुढाकार

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अंतराळात भारताचे पहिले डेटा सेंटर उभे राहण्याचा दिवस आता फार दूर राहिलेला नाही. हे ऐतिहासिक पाऊल टाकण्यासाठी भारतीय स्पेस कंपनी अग्निकुल कॉसमॉस आणि नीव क्लाऊड एकत्र येऊन देशाचे पहिले डेटा सेंटर थेट अंतराळात उभारण्याची तयारी करत आहेत. हे डेटा सेंटर पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत स्थापित करण्यात येणार आहे.

उपलब्ध माहितीनुसार, चालू वर्षाच्या अखेरीस या स्पेस डेटा सेंटरचा पहिला प्रोटोटाईप टेस्टसाठी पाठवण्यात येणार आहे. चाचणी यशस्वी ठरल्यास भविष्यात हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येऊ शकते. राजधानीत नुकत्याच पार पडलेल्या एआय समिट 2026 मध्ये या दोन्ही कंपन्यांनी या प्रकल्पाचे मॉडेल सादर केले होते. नीव क्लाऊडने सांगितले की, प्रकल्पाची तयारी जवळपास पूर्ण झाली असून, लवकरच प्रोटोटाईप अंतरिक्षात पाठवण्याची प्रक्रिया सुरू होईल.

एलन मस्कही स्पेस डेटा सेंटरच्या शर्यतीत

अमेरिकन उद्योगपती एलन मस्क हेही स्पेस एक्समार्फत अंतराळात डेटा सेंटर उभारण्यावर काम करत आहेत. त्यांचा प्रकल्प सध्या पायलट आणि डेमो टप्प्यात असून, यावर्षी अखेर प्रोटोटाईप पाठवण्याची योजना आहे. अशा परिस्थितीत भारताचा हा उपक्रम जागतिक स्तरावर विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.

अंतराळ डेटा सेंटरची काय गरज?

सध्या मोठे डेटा सेंटर जमिनीवर उभारले जातात. त्यासाठी प्रचंड वीज, महागडी कूलिंग सिस्टीम आणि मोठी जागा लागते. यामुळे खर्चही मोठ्या प्रमाणावर वाढतो. अंतराळात डेटा सेंटर उभारल्यास एआय प्रोसेसिंग थेट अंतरिक्षात होईल, डेटा अपलोड-डाऊनलोडसाठी लागणारा वेळ कमी होईल. सूर्याच्या थेट प्रकाशातून वीजनिर्मिती शक्य असेल. नैसर्गिक थंड वातावरणामुळे कूलिंगचा खर्चही कमी येईल. यामुळे एआय सेवा वेगवान व दीर्घकाळात स्वस्त होऊ शकतात.

चेन्नईस्थित अग्निकुल कॉसमॉस ही स्पेस टेक कंपनी असून, लहान आणि किफायतशीर रॉकेट लाँचवर कंपनीचा भर आहे. नीव काऊड ही भारतीय एआय आणि क्लाऊड कंपनी आहे. दोन्ही कंपन्या मिळून एआयचे काम अंतराळातून शक्य आहे का, याची व्यवहार्यता तपासणार आहेत.

वर्षअखेरीस पहिली चाचणी

दोन्ही कंपन्यांच्या मते, 2026 च्या अखेरीस पहिली चाचणी होईल. सुरुवातीला मर्यादित वापर आणि नंतर हळूहळू मोठ्या प्रमाणावर विस्तार केला जाईल. तज्ज्ञांचे मत आहे की, हा प्रयोग यशस्वी ठरल्यास एआय आणि डेटा प्रोसेसिंगची संपूर्ण कार्यपद्धती बदलू शकते.

...म्हणून हे सेंटर भारतासाठी महत्त्वाचे

भारत गेल्या काही वर्षांत अंतराळ आणि एआय या दोन्ही क्षेत्रांत वेगाने प्रगती करत आहे. हा प्रकल्प भारताची तांत्रिक क्षमता अधोरेखित करणार असून, जागतिक पातळीवर भारताची ओळख मजबूत करेल. विशेष म्हणजे भविष्यात अंतराळातून एआय सेवा देणार्‍या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT