नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताने 2047 पर्यंत देशात 350 ते 400 विमानतळ उभे करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री किंजरापू राममोहन नायडू यांनी दिली. ही पायाभूत सुविधांची योजना संधी, विकास आणि कनेक्टिव्हिटी वाढवण्यासोबतच उच्चतम हवाई सुरक्षा मानके कायम ठेवण्याची देशाची बांधिलकी दर्शवते, असे त्यांनी सांगितले.
विज्ञान भवन येथे पहिल्या आशिया पॅसिफिक रिजन अपघात तपास गटाच्या बैठकीच्या उद्घाटन सत्रात नायडू यांच्या वतीने वाचून दाखवलेल्या संदेशात ते बोलत होते. आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील सदस्य राष्ट्रांच्या सहकार्यामुळे सुरक्षा देखरेख आणि अपघात प्रतिबंधाच्या बाबतीत उत्तम मानके निश्चित झाली आहेत, असे ते म्हणाले.
भारताने आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटनेच्या मानके आणि शिफारशींच्या अंमलबजावणीमध्ये उल्लेखनीय प्रगती केली आहे. 2017 मध्ये 70 टक्के असलेल्या भारताच्या अनुपालन गुणांमध्ये आता 85 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे, ज्यामुळे जागतिक क्रमवारीत 112 वरून 55 व्या स्थानावर मोठी सुधारणा झाली आहे.
नागरी हवाई वाहतूक सचिव समीरकुमार सिन्हा यांनीही विमान अपघात (अपघात आणि घटनांचा तपास) नियम, 2017 द्वारे 13 मानके स्वीकारल्याचे स्पष्ट केले.
प्रमुख मुद्दे
2047 पर्यंत भारतात 350 ते 400 विमानतळ उभारण्याचे लक्ष्य.
सुरक्षा देखरेखीत भारताचा अनुपालन स्कोअर 85 टक्क्यांपर्यंत वाढला.
अपघात तपासणीसाठी भारतीय प्रयोगशाळा सुविधा सदस्य राष्ट्रांसाठी खुली.
राष्ट्रीय हवाई सुरक्षा केंद्र जेवार येथे प्रस्तावित.