केंद्रीय गृहमंत्री अमित शहा File Photo
राष्ट्रीय

31 मार्चपर्यंत देश नक्षलमुक्त करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

Amit Shah : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या खात्म्यानंतर X पोस्टमधून दिली माहिती

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडमधील दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये गुरूवारी सुरक्षा दलांनी 22 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवादाविरोधात केंद्र सरकारच्या झीरो टॉलरन्स भूमिकेचा पुनरूच्चार केला. तसेच 31 मार्च 2026 पर्यंत देश नक्षलमुक्त करणार असल्याचेही त्यांनी X पोस्टमध्ये म्हटले आहे. (central home minister Amit Shah on Naxalism in india)

X वरील पोस्टमध्ये अमित शाह यांनी म्हटले आहे की, "आज आमच्या सैनिकांनी 'नक्षल मुक्त भारत अभियान'च्या दिशेने आणखी एक मोठं यश संपादन केलं आहे. छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील बीजापूर आणि कांकेरमध्ये आमच्या सुरक्षा दलांनी दोन वेगवेगळ्या कारवाईंमध्ये 22 नक्षलवाद्यांना ठार केले. पुन्हा पुन्हा संधी देऊनही जे नक्षलवादी आत्मसमर्पण करण्यास तयार नाहीत त्यांच्याबाबत मोदी सरकारचा दृष्टिकोन झीरो टॉलरन्सचा आहे. भारत 31 मार्च 2026 पर्यंत नक्षलमुक्त होईल.

गुरुवारी छत्तीसगडमध्ये भारतीय सुरक्षा दलांनी मोठे अभियानराबवत बंदी घातलेल्या CPI (माओवादी) संघटनेच्या बंडखोरांना लक्ष्य केले. सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार बीजापूर जिल्ह्यात 18 नक्षलवाद्यांचा खात्मा केला असून कांकेरमध्ये चार नक्षलवाद्यांना यमसदनी धाडले आहे. सीमा सुरक्षा दल (BSF) आणि राज्य पोलिसांच्या जिल्हा राखीव गार्ड (DRG) च्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

बीजापूरमधील चकमक सकाळी सुरू झाली. सुरक्षा दलांनी बीजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेवर गंगालूर पोलिस ठाण्याच्या परिसरात नक्षलवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार घटनास्थळी 18 मृतदेह, शस्त्रे आणि विस्फोटक साहित्य हस्तगत केले आहे. या ऑपरेशनदरम्यान DRG युनिटचा एक जवान शहीद झाला आहे.

कांकेरमध्ये, चार माओवाद्यांना कोरोकसोडो गावाजवळ चोठेबेठिया पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात ठार करण्यात आले. कांकेर-नरायणपूर सीमेवर हे ऑपरेशन अद्याप सुरू आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी स्वयंचलित शस्त्रे हस्तगत केली आहेत.

दरम्यान, गेल्या आठवड्यात 17 नक्षलवाद्यांनी बीजापूर जिल्ह्यात आत्मसमर्पण केले होते तर फेब्रुवारी महिन्यात सुरक्षा दलांनी 18 माओवाद्यांना अटक केली होती. तीन वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये विस्फोटक साहित्यही जप्त केले होते.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव साय यांनीही सुरक्षा दलांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, आम्ही आमच्या सुरक्षा दलांच्या प्रयत्नांचे कौतुक करतो. केंद्रीय गृहमंत्र्यांनी 31 मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद संपविण्याचे वचन दिले आहे. आम्हाला खात्री आहे की त्यांचे वचन पूर्ण होईल. हे डबल-इंजिन सरकारचे फायदे आहेत, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT