नवी दिल्ली : 'एक राष्ट्र, एक वेळ' हे सूत्र राखण्याच्या उद्देशाने आणि भारतीय प्रमाण वेळेत (आयएसटी) अचूकता साध्य करण्यासाठी, केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने मसुदा जारी केला आहे. हा मसुदा सार्वजनिक सल्लामसलत विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या मसुद्यावर १४ फेब्रुवारी पर्यंत सूचना आणि शिफारशी मागवल्या आहेत.
नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी (एनपीएल) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) सहकार्याने मिलिसेकंद ते मायक्रोसेकंद इतक्या अचूकतेसह भारतीय प्रमाण वेळ प्रदर्शित करण्यासाठी एक प्रकल्प हाती घेतला आहे. भारतातील पाच वैध मापनशास्त्र प्रयोगशाळांमधून आयएसटी प्रदर्शित करण्यासाठी तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा निर्माण करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट असल्याचे केंद्र सरकारने नमूद केले आहे. अंतराळातील दिशादर्शन आणि गुरुत्वीय लहरींचा शोध यांसह दिशादर्शन, दूरसंवाद, पॉवर ग्रीड सिंक्रोनायजेशन, बँकिंग, डिजिटल शासन आणि अत्याधुनिक शास्त्रीय संशोधन यांसारख्या क्षेत्रांसाठी ही अचूकता महत्त्वाची आहे.
ग्राहक व्यवहार सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्च आंतर-मंत्रालयीन समितीच्या बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर ग्राहक व्यवहार विभागाच्या वैध मापनशास्त्र शाखेने वैध मापनशास्त्र(भारतीय प्रमाण वेळ) नियम २०२५ चा मसुदा, सर्वसमावेशक प्रमाणीकरण आणि भारतभरात सर्वत्र भारतीय प्रमाणवेळेचा अंगिकार अनिवार्य करण्यासाठी प्रकाशित केला. सर्व क्षेत्रांमध्ये भारतीय प्रमाणवेळेचा अंगिकार अनिवार्य करणे, वेळेत एकसमानता आणि अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रस्तावित मुसद्याचा उद्देश आहे.