वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) ताज्या अहवालानुसार, भारत २०२७ पर्यंत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असून या अहवालात भारत आणि जपान यांच्या आर्थिक वाटचालीतील फरक ठळकपणे स्पष्ट करण्यात आला आहे.
आयएमएफच्या अहवालानुसार चालू वर्ष संपेपर्यंत जपान सकल देशांतर्गत उत्पादनात चौथ्या क्रमांकावर कायम राहील. तथापि, २०२७ मध्ये भारत जपानची जागा घेईल. त्यावेळी भारताचा जीडीपी ४.५२ ट्रिलियन अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. २०२७ मध्ये जपान घसरून सहाव्या क्रमांकावर येईल आणि भारत व युनायटेड किंगडम हे दोन्ही देश पुढील क्रमांकावर जातील.
जागतिक आर्थिक आव्हाने असूनही भारताने गेल्या काही वर्षांत मजबूत वाढ दाखवली आहे. याउलट, जपानला लोकसंख्येचे वाढते वय आणि इतर समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे तेथील आर्थिक वाढ मंदावली आहे. सध्या अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून, त्यानंतर चीन आणि जर्मनीचा क्रमांक लागतो.
जपानचा विकास दर मंदावणार
जपानचा विकास दर चालू वर्षात ०.७ टक्केपर्यंत मंदावण्याचा अंदाज आहे. इंधनाच्या वाढत्या किमती आणि महागाईमुळे जपानला मोठा फटका बसला आहे. यास्तव ‘बँक ऑफ जपान’ला व्याज दरात गेल्या तीन दशकांतील सर्वात मोठी वाढ करावी लागली याकडे आयएमएफचे आशिया विभागाचे संचालक श्रीनिवासन यांनी लक्ष वेधले आहे.
भारताची भक्कम स्थिती
आशिया-पॅसिफिक क्षेत्राचा प्रादेशिक आर्थिक अहवाल जारी करताना आयएमएफचे आशिया विभागाचे संचालक कृष्ण श्रीनिवासन यांनी महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष वेधले आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे वाढलेल्या इंधनाच्या किमतींचा झटका बसण्यापूर्वीच भारताची आर्थिक स्थिती भक्कम होती. विकास दर उत्तम होता आणि राजकोषीय शिस्त पाळली जात होती. त्यामुळे इंधनासह जागतिक आर्थिक संकटाला भारताने धैर्याने तोंड दिले, असे श्रीनिवासन म्हणाले.