India Pakistan Tension
कर्जे आणि बेलआउट पॅकेज घेऊन दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने त्याची आर्थिक कोंडी करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी भारत आता जागतिक बँक आणि टेरर फंडिंगवर नजर ठेवणाऱ्या फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सशी (FATF) संपर्क साधण्याच्या तयारीत आहे. भारत आता जूनमध्ये पाकिस्तानच्या २० अब्ज डॉलर्सच्या बेलआउट पॅकेजच्या मंजुरीवर पुनर्विचार करण्यास जागतिक बँकेला सांगणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.
पाकिस्तानला पुन्हा ग्रे लिस्टमध्ये टाकण्यासाठी भारत एफएटीएफकडे सक्रियपणे पाठपुरावा करणार आहे. ज्यामुळे पाकिस्तानच्या आर्थिक व्यवहारांची अधिक चौकशी होईल. परिणामी, परदेशी गुंतवणूक आणि भांडवल प्रवाहावर निर्बंध लादले जाऊ शकतात.
पाकिस्तानला जून २०१८ मध्ये एफएटीएफच्या 'ग्रे लिस्ट'मध्ये टाकण्यात आले होते. दरम्यान, पाकिस्तान सरकारने टेरर फंडिंग रोखण्याचे आश्वासन दिल्यानंतर ऑक्टोबर २०२२ मध्ये त्यांना 'ग्रे लिस्ट'मधून काढून टाकण्यात आले. त्यावेळी पाकिस्तानने दहशतवादी गटांशी संबंध असलेल्यांना तुरुंगात टाकल्याची आणि त्यांची मालमत्ता जप्त केल्याचा दावाही केला होता.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) ९ मे रोजी पाकिस्तानच्या १ अब्ज डॉलर्सच्या बेलआउट पॅकेजला मंजुरी दिली होती. दरम्यान, भारताने आयएमएफच्या या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला होता. सूत्रांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला दिलेल्या बेलआउट पॅकेजमुळे भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.